कुत्रा चावल्याने रुग्णाची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:21 PM2020-07-14T12:21:19+5:302020-07-14T12:21:33+5:30

धक्कादायक : कोणतेच रुग्णालय घेईना, सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत गंभीरावस्थेत

Patient's bite after dog bite | कुत्रा चावल्याने रुग्णाची फरपट

कुत्रा चावल्याने रुग्णाची फरपट

Next

जळगाव : पिसाळलेल्या कुत्र्याने तोंडाला चावा घेतलेले एक वृद्ध तब्बल सहा तास उपचाराअभावी तशाच गंभीर अवस्थेत नातेवाईंकांसह शहरातील दवाखान्यात फिरले. मात्र, एकाही रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतले नाही़ आरोग्य सुविधांबाबत वाभाडे काढणारा हा संतापजनक प्रकार सोमवारी दुपारी समोर आला़ अखेर कोविड रुग्णालयात नॉन कोविड रुग्णावर उपचार करण्याची वेळ आली़ यात शासकीय यंत्रणेने खासगी रुग्णालयांपुढे गुडघे टेकल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे़
कोठारी नगरातील अशोक वाणी (५०) हे घराबाहेर उभे होते. एका पिसाळलेल्या कुत्र्याने आधी पाच ते सहा जणांना चावा घेतला होता़ अचानक या कुत्र्याने त्यांच्या अगदी जबड्याला चावा घेतला़ सकाळ नऊ वाजेच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली़ घरी ते व त्यांच्या पत्नीच असून दोनही मुले पुणे येथे असतात. अशा स्थितीत शेजारी व रिक्षाचालक योगेश पाटील यांनी त्यांना तात्काळ रिक्षाने शिवाजीनगरच्या रुग्णालयात नेले़

सहा तास सहा रुग्णालय
शिवाजीनगरातील मनपा रुग्णालय - डॉ़ उल्हास पाटील रूग्णालय - कोविड रुग्णालय- आॅर्किड रुग्णालय- शिवाजीनगरातील मनपा रूग्णालय आणि नंतर कोविड रुग्णालय़ अशी सहा तास या इसमाची एकदम गंभीरावस्थेत फरपट झाली़ नातेवाईक पूर्णत: हतबल झालेले होते़ प्रशासनावर संताप व्यक्त करीत होते़ मात्र, रुग्णालये हात वर करीत होती़

दोन कुत्र्यांना नागरिकांनी केले ठार
कोठारी नगरात या पिसाळलेल्या कुत्र्याने पाच ते सहा जणांना चावा घेतला. अनेकांना जखमी केले आहे़ दोन कुत्र्यांना नागरिकांनी कुत्र्याला मारून टाकले़

सायंकाळी हलविले खासगीत
अशोक वाणी यांना अखेर कोविड रुग्णालयात एक रेबीज व एक एआरएस अशी दोन इंजेक्शन्स देण्यात आली. त्यांना दहा ते बारा टाके पडले आहेत. जखमेच्या ठिकाणी ड्रेसिंग करण्यात आले़ यानंतर त्यांना आपत्कालीन कक्ष एक मध्येच दाखल करण्यात आले होते़ मात्र, या ठिकाणी कोविडचे रुग्ण असल्याने अखेर सायंकाळी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले़

खासगी रुग्णालयापुढे वॉररूमने टेकले हात
या घटनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉररूमशी संपर्क साधण्यात आला़ त्यांनी खाजगी रूग्णालयात हलविण्यास सांगितले़ नातेवाईकांनी तात्काळ वाणी यांना हलविले़ मात्र, खाजगी रुग्णालयानेही हात वर केले़ नातेवाईकांनी पुन्हा वॉर रूमशी संपर्क केला़ मात्र, त्यंनी शिवाजीनगरच्या रुग्णालयात जा असे उत्तर दिले़ त्यामुळे नातेवाईक पुन्हा शिवाजी रुग्णालयात गेले, तिथून पुन्हा कोविड रुग्णालयातच आले़

नॉन कोविड रुग्णांची फरपट थांबणार कधी
शहरात जिल्हा रुग्णालयच अस्तित्वात नसणे ही अत्यंत धक्कादायक बाब असून योजनेतील रुग्णालयांनी या आधीही अनेक रुग्णांना गेटवरूच माघारी पाठविले आहे. अनेकांचे वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गेल्याच्या तक्रारीही अनेक समोर आहेत़ अशा स्थितीत या घटनेने शासकीय वैद्यकीय यंत्रणा कुचकामी असल्याचे सिद्ध केल्याचा आरोप होत असून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे़ रुग्णांना नाकारणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे़

Web Title: Patient's bite after dog bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.