दुर्लक्षामुळे भालोदच्या रुग्णाची प्रकृती खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:18+5:302021-05-07T04:17:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : निरामय कोविड हॉस्पीटल येथे दाखल एका ६७ वर्षीय रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : निरामय कोविड हॉस्पीटल येथे दाखल एका ६७ वर्षीय रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या रुग्णाला व्हेंटीलेटरसाठी पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहेत. रुग्णाकडे पूर्ण लक्ष होते व त्यांना व्हेंटीलेटर लागेल ही कल्पना नातेवाईकांना दिल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
भालोद ता.यावल येथील रहिवासी सुरेश भिवा भालेराव यांना सुरूवातीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची ऑक्सिजन पातळी ही ८८ होती. मात्र ऑक्सिजन लावून ती ९५ पर्यत जात होती. अशी माहिती रुग्णाची मुलगी संगीता मोरे यांनी दिली. त्या ठिकाणी आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांची प्रकृती उत्तम होती. तीन ते चार दिवसांनी आम्ही त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना निरामय रुग्णालयात दाखल केले. मात्र, या ठिकाणी त्यांना ऑक्सिजन व्यवस्थित लावले जात नव्हते, डॉक्टर येत नव्हते, त्यांचा एचआरसीटी वेळेवर काढला गेला नाही. त्यामुळे वडिलांची तब्बेत अचानक बिघडल्याचे संगीता मोरे यांनी म्हटले आहे. अखेर त्यांना गुरूवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रुग्णालयात नातेवाईकांनी डॉक्टरांची भेट घेतली होती. यावेळी काहीशी गर्दी झाली होती.
कोट
रुग्णाचे फुफ्फुस डॅमेज असल्याने बायपॅप शिवाय त्यांची ऑक्सिजन पातळी सुधारत नाहीय. त्यांना व्हेंटीलेटर लागेल हे नातेवाईकांना आपण आधीच सांगितले होते. शिवाय त्यांचे नातेवाईक आमच्याकडे कार्यरत आहेत. त्या स्वत: त्यांच्यावर लक्ष ठेवून होत्या. त्यांना आपण योग्य उपचार दिले आहे. - डॉ. सुशील राणे, निरामय हॉस्पिटल