कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:39+5:302021-01-09T04:13:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी एकत्रित ४२ बाधित आढळून आले असून यापैकी २९ रुग्ण हे जळगाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी एकत्रित ४२ बाधित आढळून आले असून यापैकी २९ रुग्ण हे जळगाव शहरातील असून यात गंभीर बाब म्हणजे आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २२ रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे शहरात लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे.
शुक्रवारी जिल्हाभरात ५२२ आरटीपीसीआर तर ३१० ॲन्टीजन चाचण्या झाल्या. शहरात महापालिकेतर्फे झालेल्या ॲन्टीजन चाचण्यांमध्ये एकही बाधित रुग्ण नव्हता तर आरटीपीसीआरमध्ये १५ बाधित रुग्ण समोर आले होते. भुसावळ तालुक्यातील ५६ वर्षीय पुरूष आणि ६५ वर्षीय महिला यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतांची संख्याही वाढत असून ही संख्या १३३६ वर पोहोचली आहे. दरम्यान, ४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
शहरात या भागात रुग्ण
रामदास कॉलनी २ यासह आशाबाबा नगर, ईश्वर कॉलनी, दादावाडी, महाबळ, गणेश कॉलनी, रायसोनी नगर, तळेले कॉलनी, सुप्रिम कॉलनी, खोटेनगर, शनीपेठ, रिंगरोड या भागांमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत.