कोरोना झाल्यानंतर रुग्णांना येतेय रक्त गोठण्याची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:51+5:302021-04-26T04:13:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरूणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरूणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत. यात एक मुख्य कारण म्हणजे कोरोनानंतर शरीरात रक्तगोठण्याची समस्या निर्माण होऊन त्याने मृत्यू होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. कोरोनातील उपचारांच्या काही औषधींचाही हा परिणाम असू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे, त्यामुळे व्यसनांपासून लांब राहणे व पौष्टीक आहार घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोरोना उपचारात वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर या इंजेक्शनमुळे रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता असते. हे प्रमाण कमी रुग्णांमध्ये असले तरी यामुळे धोका संभवतो. एकत्रितच कोरोनामुळे शरीरात विविध रासायनिक घटकांची निर्मिती होऊन त्यामुळे रक्ताच्या गाठी होतात व त्यामुळे अचानक मृत्यू ओढावू शकतो, हे देखील तरूणांमधील वाढत्या मृत्यूचे एक कारण असल्याचे औषध वैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले आहे.
काय काळजी घ्यावी
कोरोना बाधित झाल्यानंतर अनेक वेळा उपचारांमध्ये रक्तपातळ होण्याची औषधी दिली जाते. शिवाय तरूणांनी मद्यपान, धुम्रपान या गोष्टी टाळाव्यात निरोगी आयुष्य कस जगता येईल, यावर भर ठेवावा, सी व्हिटॅमिनचे समतोल प्रमााणात सेवन करावे, आहार पाैष्टीक असावा, पुरेशी काळजी घ्यावी, असा सल्ला डॉ. नाखले यांनी दिला आहे.
पोस्ट कोविड नंतरच्या समस्या
कोरोना झाल्यानंतर बरेच दिवस रुग्णांना थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणे या बाबी कायम राहतात, काहींच्या फुफ्फुसांवर परिणाम झालेला असतो, अशा स्थितीत आराम करणे, पुरेसा व्यायाम करणे, श्वासांचे व्यायाम करणे, याेग्य आहार घेणे, याबाबी कराव्यात असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.