रूग्णांना राजवाडा नकोय, जीवदान देणारी सेवा हवीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:39 AM2021-01-13T04:39:03+5:302021-01-13T04:39:03+5:30

भंडारा येथील शासकीय रूग्णालयात इन्क्युबेटरमध्ये ठेवलेल्या १० बालकांचा शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण ...

Patients do not want a palace, they want life-saving services | रूग्णांना राजवाडा नकोय, जीवदान देणारी सेवा हवीय

रूग्णांना राजवाडा नकोय, जीवदान देणारी सेवा हवीय

Next

भंडारा येथील शासकीय रूग्णालयात इन्क्युबेटरमध्ये ठेवलेल्या १० बालकांचा शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हळहळला. या घटनेनंतर राज्यशासन व त्यापाठोपाठ प्रशासनही खडबडून जागे झाले. सर्वच रूग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र हे आदेश निघण्यापूर्वी अनेक जिल्हा रूग्णालयांचे फायर ऑडिटच झालेले नसल्याचेही या निमित्ताने उघड झाले. जळगाव जिल्हा रूग्णालयाचेही फायर ऑडिट झालेले असल्याचा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडून केला जात असला तरी त्यात निघालेल्या त्रुटींची पूर्तता अद्यापही झालेली नसल्याचे समजते. तसेच नवजात शिशू काळजी कक्ष, बालरोग विभाग आणि या कक्षांच्या खाली आग विझविणारे असे तेरा सिलिंडर लावण्यात आले आहेत. प्रत्येकाची मुदत ही तीन वर्षांची असते, मात्र, यातील सहा सिलिंडरची मुदत संपलेली असल्याचे आढळून आले. यातील दोन सिलिंडर हे २००९ सालातील असून, त्यांना अक्षरश: जाळे लागलेले आहे. नवीन सहा सिलिंडर बसविण्यात आले आहेत. इतकी अनास्था जिल्हा रूग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची आहे. यात तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र सध्या जिल्हा रूग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) राजवाड्याचे रूप देण्यातच प्रशासन धन्यता मानताना दिसत आहे. जीएमसी आवारात स्वच्छतेची व वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घेण्याची निश्चित गरज आहेच मात्र त्याआधी रूग्ण सेवेतील त्रुटी दूर करून रूग्णांना जीवनदान देण्याच्या दृष्टीने प्राधान्याने प्रयत्न होण्याची गरज आहे. जळगाव जिल्हा रूग्णालयातील बालमृत्यूचे प्रकरण यापूर्वी गाजले असून सध्या ते न्यायप्रविष्ठ आहे.२०१२-१३ या वर्षात ३०१ बालमृत्यू झाल्याची आकडेवारी माहिती अधिकारात उघड झाली होती. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी मृत्यूदर १५.०१ टक्के का आहे? याबाबत रूग्णालय प्रशासनाला विचारणाही केली होती. त्यावर बालरोग तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येईल, असे सांगत ४ बालरोगतज्ज्ञ नियुक्त करण्यात आले. मात्र २०१३-१४ मध्ये पुन्हा माहिती घेतली असता बालमृत्यूची संख्या ४४० वर पोहोचून मृत्यूदर १९.९६ टक्के झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरून आरोग्य संचालकांची समितीही नेमण्यात आली होती. या समितीने हे नियुक्त केलेले बालरोग तज्ज्ञ ड्यूटीवर येत नसल्याचे ताशेरे ओढले होते. याबाबत अखेर कोर्टाच्या माध्यमातून गुप्ता यांनी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते. त्याचे कामकाज अद्याप सुरू आहे. ही पार्श्वभूमी असतानाही रूग्णालय प्रशासनाने त्यापासून धडा घेतलेला दिसत नाही. तसे असते तर नवजात शिशू कक्षातील ६ आग विझविणारे सिलिंडर (फायर एस्टींग्युशर) कालबाह्य असलेले आढळले नसते. त्यामुळे आता भंडाऱ्याच्या घटनेनंतरही रूग्णालय प्रशासन फार काही दखल घेईल, असे चिन्ह दिसत नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून याबाबतच्या पूर्तता होतात की नाही? याची खात्री करून घेण्याची वेळ आली आहे.

Web Title: Patients do not want a palace, they want life-saving services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.