रुग्णालय इमारतीत लागलेल्या आगीमुळे जीव वाचविण्यासाठी रुग्णांची पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:08 PM2019-02-01T12:08:51+5:302019-02-01T12:09:12+5:30

विसनजी नगरमधील रुग्णालयातील घटना

Patients escape to save lives due to the fire in the hospital building | रुग्णालय इमारतीत लागलेल्या आगीमुळे जीव वाचविण्यासाठी रुग्णांची पळापळ

रुग्णालय इमारतीत लागलेल्या आगीमुळे जीव वाचविण्यासाठी रुग्णांची पळापळ

Next
ठळक मुद्दे डॉक्टरांची खोली जळून खाक

जळगाव : डॉ.राजीव नारखेडे यांच्या विसनजी नगरातील मॉन्साई रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर गुरुवारी दुपारी दीड वाजता अचानक आग लागली.या आगीमुळे रुग्णांमध्ये प्रचंड धावपळ उडाली. शस्त्रक्रिया झालेले तसेच सलाईन लावलेले रुग्ण त्याच अवस्थेत जीव वाचविण्यासाठी बाहेर पळत सुटले. या आगी डॉ.नारखेडे रहात असलेली कुटी वजा घर जळून खाक झाले आहे.
विसजनी नगरात डॉ. नारखेडे यांची तीन मजली इमारत आहे. त्यात दुसºया मजल्यावर मॉन्साई रुग्णालयात तर तिसºया मजल्यावर निवास आहे. या घराला पार्टीशन व लाकडी वस्तूंमुळे कुटीचे स्वरुप देण्यात आले. पहिल्या मजल्यावर मेडीकल व इतर दुकाने आहेत. तिसºया मजल्यावरच अचानक आग लागली.
स्वत:च हातात सलाईन घेऊन पळत सुटले रुग्ण
आगीमुळे रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरले. रुग्णालयात सर्व महिला व वृध्द रुग्ण होते. जीव वाचविण्यासाठी स्वत:च हातात सलाईन घेऊन रुग्ण बाहेर पळत सुटले. नातेवाईकांनी रुग्णांना सावरत बाहेर गल्लीत जेथे जागा मिळेल तेथे अंथरुण टाकून रुग्णाची सोय केली.
रुग्णालयात हर्निया, अपेडिंक्स, कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया, टायफाईड, दमा, पायाला गाठ, यासह इतर आजारांचे रुग्ण दाखल होते. गुरुवारी या रुग्णालयात अर्चना अनिल सपकाळे (रा. सावखेडा), वत्सलाबाई बापू सोनवणे (रा. बिलखेडा ता.जळगाव,) लक्ष्मण देवचंद बाविस्कर (रा.शनीपेठ), सुनिता समाधान आंभोरे (रा. खेडीकढोली), अनुसया भगवान शिंदे (रा.जामनेर), शिला गुलाब कामटे (रा.गेंदालाल मिल), पूजा सुरेश पाटील (रा.भडगाव), राजश्री पुरुषोत्तम ठाकरे (रा.भुसावळ), वेंदात कडू चौधरी (रा. असोदा), मिराबाई सुकदेव बाविस्कर (रा.भुसावळ) अशा दहा रुग्ण दाखल होते. या रुग्णांचे आगीमुळे प्रचंड हाल झाले.
आगीबाबत वेगवेगळ्या चर्चा...
तिसºया मजल्यावर लाकडी कुटीत शॉर्टसर्कीट झाले. त्यामुळे तेथे लगेच आग लागली. प्लास्टीक साहित्य, पूजेचे पुस्तके असल्याने आगीने क्षणातच रौद्र रुप धारण केले. डॉक्टर साईबाबांचे भक्त असल्याने त्याठिकाणी होमवहन तसेच धार्मिक पूजाविधी केले जातात. त्याचे साहित्य, कपडे, धान्य व संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. दरम्यान, या झोपडीत होमहवन सुरु असल्याने त्यामुळे आग लागल्याची चर्चा घटनास्थळी होती, मात्र डॉ.नारखेडे यांनी त्याचा इन्कार केला आहे. आग लागली तेव्हा मी स्वत: त्या ठिकाणी होतो, टाकीतील पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग वाढल्याने १०१ या क्रमांकावर संपर्क केला, प्रतिसाद न मिळाल्याने अग्निशमन दलाच्या कार्यालयात कर्मचारी पाठविला तेव्हा बंब दाखल झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोन तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली.
पोलिसांनी धाड टाकल्याची अफवेने रुग्णांची धावपळ
प्रारंभी या रुग्णालयात पोलिसांची धाड पडल्याची अफवा उडाली. या पोलिसांच्या भितीने रुग्णालयता दाखल व प्रकृती ठिक असलेले चालत-फिरत असलेले रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह पळत सुटले. यानंतर पुन्हा आगीचे कळाल्याने यानंतर इतर रुग्णांनी मिळेत त्याला सोबत घेत तळमजल्याच्या दिशेने सलाईनसह पळ काढला.
त्या खोलीत डॉक्टरांच्या आईवर उपचार
1 आग लागली त्या खोलीत डॉ.नारखेडे व त्यांच्या आई यांचे वास्तव्य होते. डॉ. नारखेडे यांच्या आई यशोदा जगन्नाथ नारखेडे यांनाही बरे नसल्याने या घरातच त्यांच्यावर उपचार सुरु होते. तेथे सलाईन लावण्यात आली होती. काही वेळातच घरालाही आग लागली. यशोदा नारखेडे यांना वेळीच हलविण्यात आले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
2 रुग्णालयात आग लागल्याच्या काही मिनिटांपूर्वीच सावखेडा येथील अर्चना अनिल सपकाळे या महिलेवर कुटूंब नियोजनाची शस्त्रकिया करण्यात आली होती. ही महिला बेशुध्द असल्याने तिला हलवितांना कर्मचाºयांसह नातेवाईकांची कसरत झाली. सोबतची रुग्ण महिलेचे नातेवाईक घाबरुले होते. आग विझविल्यावर उशिरापर्यंत ती शुध्दीवर आली नव्हती.
3 आग लागल्यावर खबरदारी म्हणून समोरील मोकळ्या जागा असलेल्या बोळीत रुग्णांना हलविण्यात आले. यावेळी बोळीत आजूबाजूच्या घरांचे लोक कचरा टाकत असलेल्या याठिकाणी अस्वच्छता होती, याचठिकाणी काही रुग्ण झोपले तर काही बसलेले होते. यात एक हर्निाया व अपेडिंक्सची शस्त्रक्रिया झालेल्या दोन महिलांचाही समावेश होता.

Web Title: Patients escape to save lives due to the fire in the hospital building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग