म्युकरमायकोसिसचे खासगीत इंजेक्शन नसल्याने रुग्णांची जीएमसीत धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:26+5:302021-05-30T04:14:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खासगी रुग्णालयांमध्ये एम्फोटेरिसीन बी हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने काही रुग्णांनी खासगी शस्त्रक्रिया करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खासगी रुग्णालयांमध्ये एम्फोटेरिसीन बी हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने काही रुग्णांनी खासगी शस्त्रक्रिया करून इंजेक्शनसाठी ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल होत आहेत. दरम्यान, शनिवारी सीटू कक्षात आणखी दोन रुग्ण वाढले असून या ठिकाणी १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून नॉन कोविड म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गुरुवारी या कक्षात दोन रुग्ण दाखल होते. शुक्रवारी ही संख्या १३ तर शनिवारी १५ वर पोहोचली होती. तसेच कोविडबाधित, मात्र म्युकरमायकोसिस असलेल्यांची संख्या ६ असून त्यापैकी दोघांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. खासगी यंत्रणेत उपचार सुरू असताना लागणारे एम्फोटेरिसीन बी या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने ज्या ठिकाणी ते सहज उपलब्ध होत आहे अशा ठिकाणी रुग्ण धाव घेत आहेत. काही रुग्णांवर बाहेर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. एका तरुणीवर नाशिक येथे शस्त्रक्रिया झाली. त्या ठिकाणी काही इंजेक्शन देण्यात आले, मात्र, तुटवड्यामुळे अखेर जीएमसीला या तरुणीला दाखल करण्यात आले.
इंजेक्शनच्या डोसवरून नातेवाइकांमध्ये संभ्रम
इंजेक्शन असूनही रुग्णाला दिले जात नसल्याची तक्रार एका नातेवाइकांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे केली होती. याबाबत शहानिशा करण्यासाठी डॉ. रामानंद यांनी तातडीने सीटू कक्षात जाऊन तपासणी केल्यावर हा संभ्रम दूर झाला. अन्य ठिकाणी पाच डोस दिले जात होते, मात्र, या ठिकाणी दोनच का, असा सवाल नातेवाइकांनी उपस्थित केला होता. मात्र, अन्य ठिकाणची मात्रा आणि इकडची मात्रा यात फरक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर हा संभ्रम दूर झाला.