बाधित झाल्यानंतर रुग्णांचे ‘सेकंड ओपिनियन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:17 AM2021-03-10T04:17:03+5:302021-03-10T04:17:03+5:30
जळगाव : ॲन्टीजन चाचणीत बाधित आढळून आल्यानंतर अनेक जण त्यावर विश्वास न ठेवता पुन्हा टेस्ट करीत असल्याचे प्रकार ...
जळगाव : ॲन्टीजन चाचणीत बाधित आढळून आल्यानंतर अनेक जण त्यावर विश्वास न ठेवता पुन्हा टेस्ट करीत असल्याचे प्रकार वाढल्याची माहिती असून ही शंका स्वत:साठी व दुसऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कोणत्याही चाचणीत बाधित आढळून येणे म्हणजे संबंधित व्यक्ती शंभर टक्के बाधित असते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या आठवडाभरा पुन्हा पुन्हा टेस्ट करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आम्हाला कोरोना नाही, हा गैरसमज अत्यंत धोकादायक ठरू शकतो, यंत्रणेवर लोक का विश्वास ठेवत नाही व स्वत:च्या जीवाशी खेळत असल्याचे सांगितले जात आहे. असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, चाचण्यांच्या गैरसमजातून अनेक लोक यंत्रणेशी वाद घालत असल्याचे प्रकारही घडत असून लोकांनी यंत्रणेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
किस्सा १
शहरातील एका गृहस्थाने एका खासगी लॅबमध्ये ॲन्टीजन चाचणी केली. ते त्यात बाधित आढळून आले. त्यांनी तासाभराने त्याच खासगी लॅबमध्ये पुन्हा चाचणी केली, यात ते निगेटिव्ह आढळून आले. अखेर त्यांनी शासकीय यंत्रणेत येऊन पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करून घेतली.
किस्सा २
शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात ॲन्टीजन चाचणीत बाधित आढळून आलेले एक गृहस्थ दुसऱ्या दिवशी आरटीपीसीआर चाचणीसाठी रांगेत उभे होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी त्यांना शोधून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.
किस्सा ३
एका गृहस्थाचा आरटीपीसीआर अहवालास विलंब झाल्याने त्यांनी ॲन्टीजन चाचणी केली. ती निगेटिव्ह आली, मात्र, आरटीपीसीआरचा अहवाल बाधित आला. यावरून त्यांनी यंत्रणेशी वाद घातला.
तज्ज्ञ काय सांगतात?
१ एखाद्या व्यक्तीची ॲन्टीजन चाचणी केल्यानंतर ती निगेटिव्ह आली आणि संबधित व्यक्तीला लक्षणे असतील तर त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते.
२ एखाद्या व्यक्तीची ॲन्टीजन चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होते, दुसरी चाचणी करण्याची गरज नसते.
३ ॲन्टीजन ही स्क्रीनिंग टेस्ट असून याची पॉझिटिव्हिटी ही शंभर टक्के असते.
एखादी व्यक्ती कोणत्याही कोरोना चाचणीत बाधित आढळल्यास त्या व्यक्तीला दुसरी चाचणी करण्याची आवश्यकता नसते. अशा व्यक्तींनी तातडीने विलग होऊन उपचार सुरू करावे, अन्यथा स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी हे धोकादायक ठरू शकते. काही कारणास्तव तासाभरानंतरची चाचणी निगेटिव्ह येऊ शकते, मात्र आधीची चाचणी बाधित असल्याने अशा व्यक्ती बधितच असतात हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. - डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा