पाटील मास्तरांनी घेतली राष्ट्रवादी महानगरची ‘शाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:15 AM2021-02-14T04:15:21+5:302021-02-14T04:15:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात जळगाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात जळगाव शहर मतदार संघाचा आढावा घेतला, यात त्यांनी सर्व कार्यकारिणीच्या सदस्यांची हजेरी घेत अचानक काहींना व्यासपीठावर बोलावून परीक्षा घेतली. पक्षवाढीसाठी काय केले याची विचारणा केली. या बैठकीला जळगावातील समस्या आणि महापालिका चुकीची कामे करतेय यावर पदाधिकाऱ्यांनी भर दिला. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या या परिवार संवाद यात्रेचा शनिवारी सायंकाळी समोराप झाला.
प्रारंभी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी आढावा घेतला. या बैठकीला कोरोनाच्या सर्व नियमांचा अक्षरक्ष: फज्जा उडाला होता. पूर्ण सभागृहात गर्दी उसळली होती. विशेष बाब म्हणजे प्रमुख पदाधिकाऱ्यांना फेटे बांधले जात होते, मात्र, मास्क एकानेही परिधान केले नव्हते. खडसेंमुळे पक्षाची ताकद वाढली असून जळगाव जिल्हा शरद पवारांच्या पाठीशी राहील असा विश्वास या संवाद यात्रेतून मिळाल्याचे जयंत पाटील म्हणाले. जलसंपदा विभागाचा आढावा अधिक वेळ चालल्याने शहर कार्यकारिणीला वेळ देता न आल्याचे पाटील म्हणाले.
काही कार्यकर्त्यांनी शेवटी पक्ष प्रवेश केल्याने गोंधळ उडाला होता. कार्यक्रमाच्या मध्येच सत्कार करण्यात येत असल्याचे बघतातच जयंत पाटील यांनी थांबवून सर्व सत्कार शेवटी करू असे सांगितले. महिला महानगराध्यक्ष पद रिक्त असल्याची चर्चा दोन वेळा झाली.
कामे नको संघटनेचे सांगा
जळगाव शहर हे धुळगाव म्हणून प्रसिद्ध झाले असून महापालिका सर्व चुकीची कामे करीत आहेत. जळगाव हे खेडेगाव झाले आहे. अशा विविध समस्या पदाधिकाऱ्यांनी जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर मांडल्या. मात्र, या समस्या मांडत असताना महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना मध्येच थांबवत कामांचे नंतर बोलू आधी पक्षवाढी काय काय केले? ते सांगा असा सवाल जयंत पाटील यांनी केला. तेव्हा पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली होती.
कार्यकारिणी होती कागदावर
आपल्याकडे शहराची जबाबदार येण्या अगोदर कार्यकारिणी केवळ कागदावर होती. विशिष्ट कारणास्तव पक्षाला वेठीस धरले होते. अशा विविध कारणांनी महापालिकेत राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. असा घरचा आहेर महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिला. जळगाव हे खेडेगाव असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
अशी ही परीक्षा
कार्यकारिणीत किती लोक उपस्थित याची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी घेतली. त्यांनी अचानक उपाध्यक्ष अकिल पटेल यांना व्यासपीठावर बोलवून पक्ष संघटना वाढीसाठी काय केले याची विचारणा केली. बैठका कधी होतात, तुमच्या परिसरात नगरसेवक कोण, असे विविध प्रश्न त्यांनी पदाधिकाऱ्यांना विचारले. यावेळी आपण आंदोलने केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर युवक शहराध्यक्ष व युवती शहराध्यक्षा आरोही नेवे यांनीही आपले अनुभव सांगितले. यानंतर जिल्हा कार्यकारिणी आणि नंतर महिला जिल्हाध्यक्षा यांच्याकडून कार्यकारिणीबाबत विचारणा केली.
चौकशीची मागणी
महापालिकेत सर्व कामे चुकीची होत असून याची उच्चस्तरीय करावी अशी मागणी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना या बाबी समोर आल्याचे त्यांनी सांगितले.