मुख्यमंत्री होण्याच्या माझ्या इच्छेचा पाटील यांनी अभ्यास केला नसावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 10:21 PM2019-08-06T22:21:36+5:302019-08-06T22:23:36+5:30

एकनाथराव खडसे : मुख्यमंत्री भाजपचाच होणार

Patil should not have studied my desire to become Chief Minister | मुख्यमंत्री होण्याच्या माझ्या इच्छेचा पाटील यांनी अभ्यास केला नसावा

मुख्यमंत्री होण्याच्या माझ्या इच्छेचा पाटील यांनी अभ्यास केला नसावा

Next

 

 




भुसावळ : मी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर माझे काय हाल झाले ? याचा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यास केला नसावा, अशी कोपरखळी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी मारत निवडणुकीनंतर मुख्यमंत्री भाजपचाच असेल असा विश्वास मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी व्यक्त केला.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर ( जी . एस . ग्राउंड ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनादेश यात्रेच्या सभेचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री खडसे हे आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय सावकारे , बेटी बचाव बेटी पढाव अभियानचे डॉ. राजेंद्र फडके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


खडसे यांची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे पाठ ?
माझी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात तारीख असल्यामुळे मी मंगळवारी रात्रीच दिल्लीला जात असल्याचे खडसे यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौºयात सहभागी राहणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र खडसे हजर राहणार नसल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

मला क्लिनचीटची गरज नाही
आपण जेष्ठ नेते असतांनासुद्धा इतर मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्लिनचीट दिली मात्र आपणास विधानसभेत क्लीनचिट देण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यावेळी मी काही केलेच नाही , तर क्लीन चीट देण्याची गरज काय ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
नुकतीच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री होण्याचे इच्छा व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात खडसे यांना विचारले असता त्यांनी माझ्या इच्छेचा अभ्यास केला नसावा , असे उत्तर त्यांनी दिले. तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा-शिवसेनेची युती होईल असेही ते म्हणाले.
गडकरींच्या मताशी सहमत
दरम्यान , गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार संजय सावकारे हे राष्ट्रवादीचे मंत्री असतानाही त्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. त्याचप्रमाणे आता पुन्हा विविध पक्षाचे नेते भाजपात प्रवेश करीत असल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही का ? असा प्रश्न विचारला असता . आमदार सावकारे यांच्या वर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नव्हते . त्यामुळे त्या वेळेस मी त्यांना प्रवेश देण्यास सहमती दर्शवली होती. आता मात्र ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, त्यांना पक्षात घेऊ नका असे माझे मत आहे. त्याचप्रमाणे हेच मत नुकतेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही जे मत व्यक्त केले आहे, त्या मताशी मी सहमत असल्याचेही खडसे यांनी सांगितले .
मुख्यमंत्र्याशी मतभेद नाही
मुख्यमंत्री फडणवीस व माझ्यात मतभेद नसल्याचेही खडसे यांनी यावेळी स्पष्ट केले. आमच्यातील मतभेद हे केवळ मीडियाने दाखविले असेही ते म्हणाले. दरम्यान, आपल्यावर अन्याय झाल्यानंतर आपण या संदर्भात केवळ पक्षांतर्गत विषय न मानता मीडियासमोर जगजाहीर मांडले. मला कुणीही पक्षशिस्त शिकवू शकत नाही असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे आज घाणखेड येथे होणार भव्य स्वागत
केलेली विकास कामे सांगण्यासाठी फडणवीस यांनी जनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेचे विदभार्तून बोदवड तालुक्यातील घाणखेडा येथे ७ रोजी आगमन होत आहे . यावेळी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू करण्यात आली असल्याचेही खडसे यांनी सांगितले . सायंकाळी बोदवड येथे स्वागत सभा होणार असल्याची माहिती खडसे यांनी दिली.
मुख्यमंत्री जाणार मुंबईला
दरम्यान , राज्यात बहुतेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे मुंबई येथे पूर स्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची विशेष बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री सात रोजी मुंबई येथे जातील व आठ रोजी पुन्हा जामनेर येथे येणार आहे . जामनेर येथे सकाळी १० वाजता त्यांची जाहीर सभा होईल, त्यानंतर अकरा वाजता भुसावळ येथे जाहीर सभा होणार आहे . येथून ते जळगाव , अमळनेर कडे रवाना होणार आहे.

 

 

Web Title: Patil should not have studied my desire to become Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.