मविप्रमध्ये पाटीलकी कायम, भोईटे गटाला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:16 AM2021-03-27T04:16:21+5:302021-03-27T04:16:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळावर स्व.नरेंद्र पाटील यांच्या गटाचीच सत्ता कायम असल्याचा निकाल जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळावर स्व.नरेंद्र पाटील यांच्या गटाचीच सत्ता कायम असल्याचा निकाल जिल्हा न्यायालयाने दिला आहे. यात नरेंद्र पाटील यांचे लहान बंधु ॲड. विजय भास्कर पाटील यांनी ही कायदेशीर लढाई दिली. मविप्रत २०१५ मध्ये नरेंद्र पाटील यांच्या गटाने विजय मिळविला.त्यानंतर भोईटे गटाने समांतर कार्यकारी मंडळ सुरू केले. त्याला तहसिलदारांनी मान्यता दिली. मात्र तहसिलदारांचा हा निर्णय न्यायालयाने आज रद्दबातल ठरवल्याने भोईटे गटाला मोठा धक्का बसला आहे.
२०१८ मध्ये संस्थेच्या ताब्यावरून वाद उद्भवल्यानंतर पोलिसांच्या प्रस्तावानुसार तत्कालिन तहसिलदार अमोल निकम यांनी संस्थेवर नरेंद्र पाटील गटाचा ताबा असल्याचे आदेश दिले. मात्र काही दिवसांनी संस्थेवर भोईटे गटाचा ताबा असल्याबाबत नव्याने आदेश दिला.
तहसिलदारांच्या या आदेशाला नरेंद्र पाटील गटाने न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबत न्यायाधिशांनी २३ पानांचा विस्तृत निकाल दिला आहे. त्यामुळे तत्कालीन तहसिलदारांनी ही संस्था नरेंद्र पाटील गटाच्या ताब्यात देण्याचा पहिला निर्णय मान्य झाला आहे. त्यामुळे आता संस्थेवर पाटील गटाचाच ताबा असणार हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात नरेंद्र पाटील गटाकडून ॲड. सैयद जाकीर अहमद, ॲड. प्रकाश पाटील यांनी काम पाहिले.
तहसिलदारांनी दिले होते दोन निकाल
वाद उद्भवल्यानंतर तत्कालिन तहसीलदार अमोल निकम यांनी पहिला निकाल हा नरेंद्र पाटील गटाच्या बाजुने दिला होता. मात्र नंतर त्यांनी तो निकाल बदलून दुसऱ्या आदेशात भोईटे गटाची सत्ता असल्याचे म्हटले होते. मात्र हा दुसरा निकाल न्यायालयाने रद्दबातल केला आहे. पहिल्या आदेशाला देखील बराच काळ उलटून गेला असून अजून त्यावर कुणीही हरकत घेतली नाही.
अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या फडणवीस- महाजन यांची चौकशी करा- ॲड.विजय पाटील
या प्रकरणात तहसिलदारांनी दिलेला पहिला निकाल मान्य झाला आहे. त्यानुसार आमच्या गटाची सत्ता मान्य झाली आहे. तरी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांना दुसरा निकाल देण्यास भाग पाडले होते. आता प्रशासनाने तत्कालिन तहसिलदारांचा जबाब घेऊन दबाव आणणाऱ्या फडणवीस आणि महाजन यांची चौकशी करावी, अशी मागणी ॲड. विजय भास्कर पाटील यांनी केली आहे.