पावणे तीन लाखाचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:40 AM2019-01-11T11:40:41+5:302019-01-11T11:55:06+5:30
एक जण ताब्यात
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजता शिवाजी नगरातील केजीएन पार्कमध्ये २ लाख ७८ हजार रुपये किमतीचा गुटखा पकडला. शाहरुख शेख ताज मोहम्मद (२३) याला ताब्यात घेण्यात आले. कारवाईनंतर गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आला.
शिवाजी नगरात एका राहत्या घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, हेकॉ. चंद्रकांत पाटील, रवींद्र गिरासे, दिनेश बडगुजर, साहेबराव चौधरी, दादाभाऊ पाटील, वाहेदा तडवी, गायत्री सोनवणे, विजयकुमार देसले व रवींद्र घुगे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी शाहरुख याच्या घरात छापा मारला असता तब्बल २ लाख ७८ हजार रुपये किमत असलेला गुटख्याचा साठा आढळून आला. घटनास्थळाचा पंचनामा करुन शाहरुख याला ताब्यात घेण्यात आले.
अन्न व प्रशासन विभागाचे पितळ उघडे
गुटख्यावर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे, मात्र या विभागाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. इतकेच पोलिसांनी पकडून दिलेल्या साठ्यानंतरही पोलिसात किंवा न्यायालयात केसेस दाखल केलेल्या नाहीत. पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.