मनपाच्या ‘त्या’ ९६ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:12 AM2021-06-11T04:12:41+5:302021-06-11T04:12:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतील ९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचे आदेश नगरविकास मंत्रालयाकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेतील ९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचे आदेश नगरविकास मंत्रालयाकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारीवर काम करत असलेल्या ९६ कर्मचाऱ्यांचा कायम सेवेत समाविष्ट होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत अखेर नगरविकास मंत्री यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेतील ९६ कर्मचारी हे रोजंदारीवर काम करत होते. तसेच या कर्मचाऱ्यांना महापालिकेने कायमस्वरूपी सेवेत घ्यायचे यासाठी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात मनपा प्रशासनविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना मनपाविरोधात केलेली याचिका मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी ही याचिका मागे घेतली होती. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर दोनच दिवसात पुन्हा आनंददायी धक्का मिळाला आहे. शासनाच्या या निर्णयाचे मधुकर कोल्हे, दिलीप नारखेडे, कमलेश सोनवणे, किशोर चौधरी, याकूब अली, प्रवीण भोळे, संजय कोळी या कर्मचाऱ्यांनी नगरविकास मंत्री शिंदे, आमदार सुरेश भोळे व महापौर जयश्री महाजन यांचे आभार मानले.
कोट..
मनपातील ९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. याबाबत नगरविकास मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
-सुरेश भोळे, आमदार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. मनपा कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतल्याने त्यांचे आभार.
-जयश्री महाजन, महापौर