थकबाकी भरा, अन्यथा वीज पुरवठा खंडीत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:32+5:302021-01-17T04:14:32+5:30
जळगाव : कोरोनामुळे अनेक ग्राहकांनी विजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, परिणामी खान्देशात ६०० कोटींच्या घरात थकबाकी पोहचली आहे. ग्राहकांनी ...
जळगाव : कोरोनामुळे अनेक ग्राहकांनी विजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, परिणामी खान्देशात ६०० कोटींच्या घरात थकबाकी पोहचली आहे. ग्राहकांनी थकबाकी भरण्याबाबत महावितरणने आक्रमक भूमिका घेतली असून, लाखो थकबाकीदार ग्राहकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. दिलेल्या मुदतीत बिलाचा भरणा न केल्यास, अशा थकबाकीदारांचा थेट विज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महावितरणतर्फे शासनाच्या आदेशानुसार घरोघरी जाऊन रिडींग न घेता, ग्राहकांना सरासरी बिले देण्यात आली. मात्र, देण्यात आलेली सरासरी बिले ही जादा असल्याच्या अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या. ग्राहकांच्या या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणने जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिरे घेतली. यामध्ये अनेक ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येऊन, विजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्राहकांना हफ्त्यानेही बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील खान्देशातील घरगुती, औद्योगिक, कृषी, लघु आदी ग्राहकांनी मार्च २०२० पासून विजबिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीदारांची संख्या वाढत असून, वसुलीसाठी महावितरणपुढे मोेठे आवाहन निर्माण झाले आहे.
इन्फो :
कोरोनामुळे कारवाई लांबली
शासनाने लॉकडाऊन कालावधीत घरोघरी जाऊन रिडींग न घेता, ग्राहकांना सरासरी विजबिले देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महावितरणतर्फे सरासरी बिले देण्यात आली. तसेच शासनातर्फे कोरोना काळात थकबाकीदार ग्राहकांकडुन कुठलीही वसुली अथवा कारवाई न करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यामुळे महावितरणतर्फे कोरोनामुळे थकबाकी दारांविरोधात कुठलिही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, शासनाने नुकतेच हे निर्बध उठविल्यामुळे, महावितरणतर्फे थकबाकीदारांना नोटीसा पाठवून, कारवाईचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
इन्फो :
प्रत्येक वायरमनला कारवाईचा अधिकार
महावितरणचे जळगाव परिमंडळात घरगुती, औद्योगिक, कृषी, वाणिज्य, लघू असे एकूण लहान-मोठे २० लाखांच्या घरात ग्राहक आहेत. यातील निम्म्याहून अधिक ग्राहकांकडे थकबाकी आहे. थकबाकीदारांची संख्या मोठी असल्यामुळे महावितरणतर्फे शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक वायरमनला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. संबंधित वायरमन वसुलीसाठी गेल्यावर, ज्या ग्राहकांनी नोटीसीची मुदत संपल्यानंतही बिल भरले नसेल, अशा ग्राहकांचा विजपुरवठा खंडित करण्याचा अधिकार वायरमन यांना देण्यात आला असल्याचे महावितरणच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी `लोकमत`ला सांगितले.