हंगाम वाया गेल्याने संपूर्ण विमा भरपाई द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:45+5:302021-08-25T04:20:45+5:30
पातोंडा ता.अमळनेर पातोंडासह परिसरात गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस पाऊस झाल्याने बळीराजाचे समाधान झाले खरे; पण गेल्या अडीच महिन्याच्या ...
पातोंडा ता.अमळनेर
पातोंडासह परिसरात गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस पाऊस झाल्याने बळीराजाचे समाधान झाले खरे; पण गेल्या अडीच महिन्याच्या पावसाच्या ओढीने संपूर्ण खरिपाचा हंगाम वाया गेल्याने बळीराजाची पूर्णतः आर्थिक घडी विस्कटली.
जून, जुलै व अर्धा आगस्टपर्यंत पावसाने ओढ दिली. जवळजवळ अडीच महिना पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतीवरच जीवनमान अवलंबून असलेल्या बळीराजाची पूर्णतः शेती उत्पादनाची व आर्थिक प्रपंचाची घडी संपूर्ण विस्कटली. असा हा बळीराजा भीषण दुष्काळी परिस्थितीच्या संकटात सापडला आहे, तरी शासनाने या गंभीर परिस्थितीची तत्काळ दखल घेऊन हेक्टरीभरीव अशी आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पातोंडासह परिसरात जून महिन्यात हलक्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली; पण दीड महिना पाऊसच पडला नाही. त्यामुळे पहिली पेरणी वाया गेली. जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणी केली. पेरणी करून एक महिना उलटला तरी उगवण पिकांवर पाऊस न झाल्याने पिके जळू लागली. खरीप हंगाम शंभर टक्के वाया जाणारच, म्हणून शेतकरी हताश झाला. महागडी कापूस, मूग, तूर आदी बियाणे पेरणी करून आर्थिक फटका बसला. जूनमध्ये एकदा, जुलैपण एकच असा फक्त साठ-सत्तर मिमी इतकाच पाऊस परिसरात झाला.
पावसाळा अगदी उन्हाळ्यासारखा
अर्धा आगस्ट महिना कोरडा गेला. भरपावसाचा ऋतु हा उन्हाळ्यासारखा जात आहे. बळीराजा हवालदिल झाला. पिके अजून जमिनीच्या कुशीतच आहेत. पावसाअभावी वाढ खुंटली आहे. वरून उन्हाचा तडाखा यामुळे पिके जळू लागली. पूर्ण खरीप हंगाम वाया गेला. आता पाऊस पडला समाधान झाले; पण खरिपाचा हंगाम वाया जाणार, हे संकट कायम राहील. दोन दिवस पाऊस पडला. आता पुन्हा पावसाने उघडीप दिली. कोमात गेलेल्या कापूस पिकाला जेमतेम जीवनदान मिळाले; पण मूग,उडीद, तीळ आदी पिके तर वाया गेलेली आहेत. आता पुढील सप्टेंबरमध्येही पाऊस नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
विमा भरपाई मिळावी
पातोंडासह परिसरातील सावखेडा, मुंगसे, रुंधाटी, मठगव्हाण, दापोरी, दहीवद,
सोनखडी, नगाव-गडखांब परिसर, नांद्री, खवशी, खेडी, अमळगाव-जळोद परिसर या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विमाधारकांना सपूर्ण विमा भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
आमदार अनिल पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे वरील दुष्काळी गावातील सरपंच, उपसरपंच ,सदस्य,सामाजिक कार्यकर्ते,यांनी दुष्काळी परिस्थितीची समस्या सांगून लेखी निवेदन दिले. त्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव अशी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. आमदार अनिल पाटील यांनी तत्काळ दखल घेऊन शासनाकडे प्रस्ताव मांडून बळीराजासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.