२५ मेपर्यंत शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला द्या, अन्यथा व्याज आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:16 AM2021-05-22T04:16:13+5:302021-05-22T04:16:13+5:30
जळगाव : दोन वर्षांपूर्वी विम्याचा हप्ता भरूनही अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ११० शेतकरी विम्यापासून वंचित असून त्यांना २५ मेपर्यंत विम्याचा मोबदला ...
जळगाव : दोन वर्षांपूर्वी विम्याचा हप्ता भरूनही अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ११० शेतकरी विम्यापासून वंचित असून त्यांना २५ मेपर्यंत विम्याचा मोबदला देण्यात यावा अन्यथा १२ टक्के व्याज लावून नुकसान भरपाईची आकारणी केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बँकांना दिला आहे.
२०१९ मध्ये काढलेल्या केळी व कापूस पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तक्रार केली होती.
त्यानुसार कृषी विभागाने बँकांना नोटीस बजावली व शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला देण्यात यावा, असे निर्देश दिले होते. याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला.
बैठकीला जिल्हाधिकारी राऊत यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्यासह बँक अधिकारी उपस्थित होते.
एक कोटी ६० लाख रुपये देणे
२०१९ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा काढून त्याचा हप्ता भरला. मात्र ३१ जुलै २०२०नंतरही त्यांना झालेल्या नुकसानीचा विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरू झाल्या व मोबदला मिळत नसल्याने शेतकरी चिंतीत झाले आणि त्यांनी पाठपुरावा सुरू केला. जिल्ह्यातील ११० शेतकरी पिक विमाच्या लाभापासून वंचित असून त्यांना एक कोटी ६० लाख रुपयांचा मोबदला मिळणे अपेक्षित आहे. हा मोबदला देण्याविषयी बँकांना नोटीस बजावल्यानंतर केवळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या यावल शाखेच्यावतीने चार शेतकऱ्यांना पाच लाख ८२ हजार रुपये मोबदला देण्यात आला. इतर बँकांनी मात्र अजूनही शेतकऱ्यांना मोबदला दिला नसल्याचे बैठकीत समोर आले.
सेवा केंद्रांनाही नोटीसशेतकऱ्यांची चुकीची माहिती भरल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे. याला शेतकरी जबाबदार नसून माहिती भरणारे सेवा केंद्र जबाबदार असल्याने जिल्ह्यातील ५ सेवा केंद्रांना नोटीस बजावण्यात आल्या आहे.