नवीन नळ संयोजनासाठीची रक्कम सात दिवसांत भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:11 AM2021-05-03T04:11:36+5:302021-05-03T04:11:36+5:30
मनपा प्रशासनाचा आदेश लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘अमृत’अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, याअंतर्गत नागरिकांना नवीन ...
मनपा प्रशासनाचा आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ‘अमृत’अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, याअंतर्गत नागरिकांना नवीन नळ संयोजन देण्याचे कामदेखील मनपा पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. ज्या नागरिकांची नवीन नळ संयोजनाची जोडणी अद्याप झाली नाही, अशा नागरिकांनी सात दिवसांच्या आत रक्कम भरून ती जोडणी करून घेण्याचे आवाहन मनपा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. सात दिवसांच्या आत ही रक्कम न भरल्यास नागरिकांना खर्चाच्या दुप्पट रक्कम मनपात भरावी लागेल, असा इशारादेखील मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम आता ९० टक्के पूर्ण झाले आहे. महापालिकेने नवीन नळ संयोजनचे कामदेखील हाती घेतले असून, आतापर्यंत वीस हजारांहून अधिक नागरिकांना नवीन नळ कनेक्शन दिले आहे. शहरातील अनेक टाक्यांचे कामदेखील पूर्ण झाले असून, नळ कनेक्शन देऊन अमृत अंतर्गत योजनेची चाचणी देखील महापालिकेकडून आता करण्यात येत आहेत. अद्यापही अनेक नागरिकांनी नवीन कनेक्शनसाठी रक्कम भरलेली नाही. अशा नागरिकांनी सात दिवसांच्या आत रक्कम भरण्याचे आदेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. अनेक भागांत नवीन वितरण व्यवस्था टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. अशाच वेळी कनेक्शन देण्याचे कामदेखील मनपा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मात्र, त्यानंतर चारी बुजल्यानंतर खोदकाम करण्यास संबंधित नागरिकांना कनेक्शनसाठी दुप्पट रक्कम मनपा प्रशासनाला द्यावी लागेल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.
वॉटर मीटरबाबत अद्यापही नियोजन नाही
अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, यासाठी वॉटर मीटरची आवश्यकता लागणार आहे. मात्र, मनपाच्या नीविदा प्रक्रियेत वॉटर मीटरची तरतूद महापालिकेने केलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा द्यायचा असेल तर वॉटर मीटर आवश्यक आहे. याबाबत अद्यापही मनपा प्रशासनाने कोणतेही नियोजन केले नसून, पुढील महासभेत वॉटर मीटरवरून वाद होण्याची शक्यता आहे.