दाखल करण्याआधी ५० हजार ॲडव्हान्स भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:17 AM2021-04-07T04:17:21+5:302021-04-07T04:17:21+5:30
जळगाव : शासनाने कोविड उपचारांसाठी अनेक खासगी रुग्णालयांना परवानगी दिली आहे. मात्र, यात काही खासगी रुग्णालयात उपचारांसाठी जाणाऱ्यांना आधी ...
जळगाव : शासनाने कोविड उपचारांसाठी अनेक खासगी रुग्णालयांना परवानगी दिली आहे. मात्र, यात काही खासगी रुग्णालयात उपचारांसाठी जाणाऱ्यांना आधी ॲडव्हान्स मग उपचार अशी अट ठेवली जाते. अशा स्थितीत सामान्यांपुढे मात्र यक्ष प्रश्न उभा राहत आहे. शासनाने दर ठरवून दिले आहेत. यात ८० टक्के खाटा या शासकीय दरानुसार, तर २० टक्के खाटा या खासगी दरानुसार बंधनकारक केले आहे. मात्र, काही रुग्णालयांच्या अटी मात्र सामान्यांच्या आवाक्याबाहेरच असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील ११३ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात अनेक निकष घालून देण्यात आले आहेत. शिवाय शासकीय दर ठरवून देण्यात आले असून, यात सद्य:स्थितीत ४६२४ बेड असून, ३८७१ रुग्ण दाखल आहेत. जळगाव शहरात सर्वाधिक रुग्णांना याची मंजुरी मिळाली आहे. काही रुग्णालयांमध्ये मात्र पूर्णत: शासकीय दरानुसारच बिलांची आकारणी होत असल्याचेही चित्र आहे. गेल्या वर्षीय ज्यादा दराच्या प्रचंड तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानुसार लेखापरीक्षणही करण्यात आले होते. मात्र, यातही दुजाभाव झाल्याचा आरोप समोर आला होता. अनेक रुग्णालयांना दंडही ठोठावण्यात आला होता. अनेक रुग्णांना मोठी रक्कमही या रुग्णालयांना परत करावी लागली होती.
बेड अपूर्णच
जिल्ह्यात गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे व्हेंटिलेटरची संख्या कमी पडत आहेत. यात अनेक वेळा खासगी रुग्णालयांतही बेड उपलब्ध होत नसल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. यात शासकीय यंत्रणेतील बेडही कमी पडत असल्याचे चित्र असताना पैसे मोजूनही रुग्णांना बेड मिळत नसल्याचे मध्यंतरी गंभीर चित्र निर्माण झाले होते.
शासकीय दर प्रतिदिन असे
अलगीकरण- जनरल वॉर्ड : ४००० रुपये,
व्हेंटिलेटरशिवाय आयसीयू : ७५०० रुपये
आयसीयू व्हेंटिलेटरसह : ९००० रुपये
५ दिवसांचे ५६ हजार
एका रुग्णाकडून एका रुग्णालयाने पाच दिवस सामान्य कक्षात अलगीकरणात ठेवण्याचे ५६ हजार बिल आकारणी केली आहे. याचा अर्थ दर दिवसाला ११ हजार प्रतिदिन एवढी मोठी रक्कम सामन्य कक्षासाठी रुग्यणालयाकडून त्यांच्या खासगी बेडच्या क्षमतेसाठी आकारली जात आहे. यास रुग्णालयात केवळ दोन तास सलाईन लावून घरी गेल्यानंतर या दोन तासांचेही चार हजार रुपये आकारण्यात आले. पाच दिवसांचेही २० रुपये आकारण्यात आल्याची माहिती एका रुग्णाच्या नातेवाइकाने दिली आहे.
कोट
आमच्या नातेवाइकांना दम लागत होता. त्यांना खासगीतही बेड मिळत नव्हता, बराच वेळ फिरफिर केल्यानंतर एका रुग्णालयात बेड मिळाला. मात्र, आधी ५० हजार ॲडव्हान्स भरावा लागेल, अशी अट रुग्णालयाने ठेवली, सोबत लहान मुले होती. आम्ही सांगितले की, पैसे कुठे जाणार नाही. मात्र, त्यांनी मॅनेजमेंंट सोबत बोलावे लागेल असे सांगितले.
- एका रुग्णाचे नातेवाईक