पायलची आत्महत्या नव्हे, खूनच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:00 PM2019-05-28T12:00:25+5:302019-05-28T12:00:49+5:30
पतीसह आई, वडीलांचा आरोप
सुनील पाटील
जळगाव : मुंबईत मृत्यू झालेल्या डॉ.पायल तडवी हिने आत्महत्या केलेली नसून त्या तिघं वरिष्ठ सहकारी महिला डॉक्टरांनी तिचा खूनच केला असल्याचा आरोप डॉ.पायलचे पती सलमान तडवी, आई आबेदा व वडील सलीम तडवी यांनी केला आहे. पायलला धोका असल्याबाबत प्रशासनाकडे सहा महिन्यात चार वेळा तक्रारी केल्या, मात्र त्याची दखलच घेण्यात आली नाही. वेळीच दखल घेतली असती तर कदाचित पायलवर ही वेळ आली नसती असेही तिच्या पालकांना वाटते.
‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी डॉ.पायल हिच्या कुटुंबाची वाघ नगरातील घरी भेट घेतली. त्यांनी पायलच्या छळाचा पाढाच वाचला. डॉ.पायल हिच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वरिष्ठ सहकारी विद्यार्थिनी डॉ.हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहर व डॉ.अंकिता खंडेलवाल या तिघींविरूद्ध मुंबई पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त करणे, रॅगिंग व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही विद्यार्थिनी उच्च घराण्यातील असून त्यांना अद्यापही अटक झालेली नाही. या तिघांना तत्काळ अटक करावी व त्यांची डॉक्टरकीची नोंदणी रद्द करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
या प्रकरणाची समिती नेमण्यात आली असली तरी गुन्हा दाखल असल्याने संशयितांना अटक का होत नाही असाही प्रश्न पायलच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे.
समाजातील पहिले डॉक्टर दाम्पत्य
डॉ.पायल यांचे १४ फेब्रुवारी २०१६ रोजी सलमान तडवी (रावेर) यांच्याशी विवाह झाला होता. आदीवासी तडवी समाजातील पती-पत्नी डॉक्टर असलेले डॉ.पायल व सलमान हे पहिले दाम्पत्य. त्यातच एम.डी.स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून पायल पहिलीच डॉक्टर होती. पायलचे प्राथमिक शिक्षण प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडियम स्कूल जळगाव, ११ वी व १२ वी मू.जे.महाविद्यालय, एमबीबीएसचे शिक्षण मिरज, जि.सांगली येथे धानोरा, ता.चोपडा येथे वैद्यकिय अधिकारी म्हणून निवड झाली. चार महिने नोकरी केल्यानंतर मुंबईत एम.डी.साठी निवड झाली. १ मे २०१८ पासून पायल तेथे रुजू झाली.
प्राध्यापक म्हणाल्या सहन कर
पायल हिला सहकाऱ्यांकडून त्रास असह्य होत असल्याने आई आबेदा तडवी यांनी मुंबई गाठून अधीष्ठांताची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटूच दिले नाही. जी तक्रार असेल ती टपालात टाका, त्यानंतर दहा दिवसांनी चौकशी करा असे सांगण्यात आले. त्यामुळे आबेदा तडवी यांनी एक दिवस तेथेच थांबून विभाग प्रमुख शिरुडे व अध्यापन करणाºया महिला प्राध्यापकांकडे तक्रार केली. छळाचा पाढा वाचला असता त्यांनी मदत करण्याऐवजी हे प्रकार होतच राहतात, तिला सहन करावेच लागेल असे उत्तर दिले. जेथून न्यायाची अपेक्षा होती, तेथेच निराशा झाल्याने पायल हतबल झाली अन् आज तिच्यावर ही वेळ आली. प्रशासनाने कार्यवाही केली असती तर पायल आमच्या पायलवर अशी वेळ आली नसती असे डबडबलेल्या डोळ्याने तिच्या आईने सांगितले.
पती-पत्नीची १५ दिवस भेट नाही
डॉ.पायल हिचे पती सलमान तडवी नायर हॉस्पिटलपासून नजीकच असलेल्या विलेपार्ले येथे सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीला आहेत. त्याच परिसरात त्यांनी भाड्याने घर घेतले होते. इतक्या जवळ असतानाही या तिन्ही सहकारी पंधरा-पंधरा दिवस पायलला पतीला भेटू देत नव्हते. पतीसोबत बाहेर जेवायला देखील जावू देत नव्हते. कमी वयात स्त्री रोग तज्ज्ञ तसेच लग्नही झाल्याने हे देखील तिघींना सहन होत नव्हते, असेही पायलच्या कुटुंबियांनी सांगितले.
वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्याची लेक
डॉ.पायल ही जेथे शिक्षण घेत होती, ते वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या अख्त्यारित आहे. महाजन हे स्वत: जळगाव जिल्ह्याचे. त्यांच्याच जिल्ह्याच्या विद्यार्थिनीचा रॅगिंगमुळे जीव गेला. हे प्रकरण देशभर गाजत असताना मंत्री महाजनांकडून साधी चौकशी देखील झालेली नाही किंवा त्यांनी कुटुंबियाची भेटही घेतली नाही. महाजनांकडून तरी न्याय मिळावा अशी अपेक्षा पायलच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. दरम्यान, तिन्ही डॉक्टर तरुणींना अटक व त्यांची नोंदणी रद्द झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा इब्राहिम तडवी यांनी दिला आहे.
घटनेबाबत असे आहेत संशय...
डॉ.पायल कणखर होती, ती आत्महत्या करेल असे वाटत नाही.आत्महत्या केलीच असती तर तिने कदाचित चिठ्ठी लिहिली असती. घटनेच्या दिवशी डॉ.हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहर व डॉ.अंकिता खंडेलवाल या तिघं जण तिच्या खोलीत कशासाठी गेल्या. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी चिठ्ठी गायब केली असावी. तिने स्वत:हून आत्महत्या केली असेल तर या तिघांनी सुरक्षा रक्षक किंवा पोलिसांना का बोलावले नाही. स्वत:च तिला अतिदक्षता विभागात दाखल करुन मग पतीला फोन केला. हे सारे प्रकार संशयास्पद आहेत. वसतीगृह व रुग्णालय प्रशासनाकडूनही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
पायल हिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या तिघं महिला डॉक्टरांना अटक होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी. तक्रारीची दखल न घेणाºया रुग्णालय प्रशासनाच्याविरुध्दही कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी अद्यापही या महिला डॉक्टरांना अटक केलेली नाही.
-आबेदा तडवी, डॉ.पायलची आई