निविदा न काढताच सफाईच्या ठेकेदाराला केली अदायगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:21 AM2020-12-30T04:21:23+5:302020-12-30T04:21:23+5:30
‘स्थायी’तील संविदाबाबत ॲड. हाडा यांची माहिती : अनियमितता संविदाबाबत सतर्क रहा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा प्रशासनाने निविदा ...
‘स्थायी’तील संविदाबाबत ॲड. हाडा यांची माहिती : अनियमितता संविदाबाबत सतर्क रहा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा प्रशासनाने निविदा न काढताच सफाईच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराला व मुदत संपलेल्या सुरक्षकांच्या ठेकेदारासह इतर आठ कामांसाठी मनपाने अडीच कोटींच्या बिलांची रक्कम अदायगी केली आहे. याबाबतच्या खर्चाला मंजुरीसाठी प्रशासनाकडून संविदा बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, या संविदामध्ये अनियमतता असून, या संविदांना मंजुरी दिल्यास भविष्यात सभापती व सदस्यांकडून हा खर्च वसूल होऊ शकतो. याबाबत माजी स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांनी सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांना याबाबत सतर्क राहण्याची विनंती करणारे पत्र पाठविले आहे.
फेब्रुवारी महिन्यात मनपा प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीचे काम थांबवून तात्पुरत्या स्वरूपात एस. के. कॉन्ट्रॅक्टरला ठेका दिला होता. या मक्तेदाराला बांधकाम विभागात केवळ नऊ कर्मचारी पुरविण्याचा मक्ता दिला होता. मात्र, मनपाने ४०० कर्मचारी पुरविण्याचा मक्ता कोणत्याही निविदा न काढताच दिला होता. हा मक्ता तब्बल पाच महिने सुरू होता. यांसह शहरातील उद्यानांमध्ये व मनपाच्या आवारात सुरक्षारक्षक पुरविण्याचा ठेक्याची मुदत ऑगस्टमध्ये संपली असतानाही मनपाने कोणतीही निविदा न काढताच सुरक्षारक्षक पुरविण्याचा ठेक्याला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. याच प्रकारच्या आठ कामांना मनपा प्रशासनाने मुदतवाढ देऊन तब्बल २ कोटी ५८ लाख रुपयांच्या बिलांची अदायगी केली आहे. याबाबत ॲड. हाडा यांनी सभापती असतानाही य संविदावर आक्षेप घेतले होते. तसेच मनपाकडून लेखी खुलासादेखील मागितला होता. मात्र, मनपाने लेखी खुलासा दिला नाही. त्यामुळे या संविदावर सभापतींनी कायदेशीर बाबी तपासून घ्याव्यात, अशी विनंतीही ॲड. हाडा यांनी पत्राद्वारे केली आहे.