पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करा : शिक्षकांची मागणी
By admin | Published: January 11, 2017 12:44 AM2017-01-11T00:44:02+5:302017-01-11T00:44:02+5:30
महिनाभर काम करून हजार-दोन हजारांवर रक्कम जिल्हा बँकेतून मिळत नसल्याने आमचे पगार जिल्हा बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत, अशी मागणी तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांनी शिक्षणाधिका:यांकडे केली आहे.
धरणगाव : ‘नोटबंदी’च्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची गंभीर स्थिती झाली असून खातेदार, पगारदार, शेतक:यांना पुरेसा पैसा देण्यास बँक असमर्थ ठरत आहे. महिनाभर काम करून हजार-दोन हजारांवर रक्कम जिल्हा बँकेतून मिळत नसल्याने आमचे पगार जिल्हा बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत, अशी मागणी तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांनी शिक्षणाधिका:यांकडे केली आहे.
सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आठवडय़ातून 24 हजार रुपये बँकांनी देण्याचे जाहीर केले आहे. मात्र तालुक्यातील जिल्हा बँकांच्या शाखांमधून कुठून दोन हजार, कुठून हजार रुपये तर कुठून पाच-दहा हजार रुपये मिळत आहेत. जिल्हा बँकेच्या शाखेत गेल्यावर अनेकदा पैसे नसल्याचे सांगितले जाते, तर कधी दोन/चार हजार रुपये घेऊन घरी यावे लागते. त्यामुळे संसाराचा गाडा हाकविणे, वीज बील, कर्जाचे हप्ते भरणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांचे पगार जिल्हा बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याची मागणी माध्यमिक शिक्षकांनी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्याकडे केली आहे.
शिक्षणाधिका:यांनी यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवून शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकांमार्फत होण्यासाठी प्रयत्न करावेत व शिक्षकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
माध्यमिक शिक्षक पतपेढीतून कर्ज काढल्यानंतर वा पीएफचे कर्ज काढल्यानंतर अथवा सेवानिवृत्तीनंतर मिळणारी अनेक शिक्षकांची रक्कम जिल्हा बँकेत जमा झाली असून, ज्या कामासाठी पीएफचे वा पतपेढीचे कर्ज शिक्षकांनी काढले आहे. त्यासाठी वेळेवर जिल्हा बँकेकडून रक्कम मिळत नसल्याने शिक्षक वा इतर पगारदार चिंताग्रस्त झाले आहेत. कर्जाचे व्याज सुरू झाले तरी रक्कम मात्र जिल्हा बँकेत अडकून पडल्याने त्यांचे व्याज वाढत आहे. (वार्ताहर)
जिल्हा बँकेतून गेल्या अनेक वर्षापासून माध्यमिक शिक्षकांचे पगार होत आहेत. मात्र गेल्या दोन/तीन महिन्यांपासून जिल्हा बँक शिक्षकांच्या पगाराची रक्कम देण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे शासनाने राष्ट्रीयकृत बँकेतून पगाराची व्यवस्था करण्याची आमची मागणी आहे.
- जाकीर पटेल, शिक्षक, नीळकंठेश्वर विद्यालय, चावलखेडा, ता.धरणगाव