बोदवड येथे वृक्ष संवर्धनातून मृतात्म्यालाही लाभतेय शांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 06:04 PM2019-06-05T18:04:18+5:302019-06-05T18:05:49+5:30
बोदवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘मुक्तीधाम’ स्मशानभूमीत गोरक्षनाथ संस्थेने वृक्ष लागवडच नव्हे तर त्यांचे संवर्धन केल्याने ते दिमाखात डोलत आहेत. यामुळे मुक्तीधाममध्ये आलेल्यांना सर्वांना मोठा दिलासा मिळत आहे.
गोपाळ व्यास
बोदवड, जि.जळगाव : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘मुक्तीधाम’ स्मशानभूमीत गोरक्षनाथ संस्थेने वृक्ष लागवडच नव्हे तर त्यांचे संवर्धन केल्याने ते दिमाखात डोलत आहेत. यामुळे मुक्तीधाममध्ये आलेल्यांना सर्वांना मोठा दिलासा मिळत आहे.
शहरातील ‘मुक्तीधाम’मध्ये गत २० वर्षांपूर्वी सन १९९९ मध्ये गोरक्षनाथ संस्थेने झाडे लावून ती जगवण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय याच ‘मुक्तीधाम’ला कूपनलिका करून दिली. आजूबाजूला खड्डे खोदून सुमारे शंभर झाडे लावण्यात आली. त्यात सर्वाधिक निंब, वड, पिंपळ, शिसम, नारळाची, पिपरी तसेच काही फुलझाडे लावण्यात आली. या झाडांना सुरवातीला जगवण्यास फार अडचण आली. कारण स्मशानभूमीच्या जागेत एका फुटावर मुरुम लागत असल्याने झाडे जगवण्यास अडचण येत होती. त्यावर काळी मातीचा भरणा करून गोरक्षनाथ संस्थेने मात केली. यादरम्यान बाजूला वाहत जाणाºया गटारीच्या पाण्याने काही झाडे सडली तर काही जळाली. परंतु जिद्दीने परत झाडे जगवण्यासाठी शहरातील गुजराथी नामक व्यक्तीने मुक्ताईनगर वनविभागाच्या नर्सरीतून ही झाडे आणून दिली व आजघडीला ७० झाडे डौलाने जगत आपल्या गर्द सावलीने मृत आत्म्याच्या शांतीसाठी येऊन बसणाऱ्यांनाही ‘जीवाची काहिली क्षणभर सावली’ देऊन मनशांती देत आहे.
त्र्यंबक तेली व सहकाºयांचे योगदान
येथील सेवाधारी त्र्यंबक तेली व त्यांचा सहकारी योगेश दैवे हे दोन्ही नित्याने आजही झाडांना पाणी देऊन त्यांची देखरेख करीत असतात. काही झाडे जळण्याच्या स्थितीत आल्यास त्यांना वाचवण्यासाठीही ते प्रयत्न करीत असतात. छोट्या झाडांना सुरक्षा कवच लावले असून अजून सुमारे तीस झाडे लावून जगवण्याचा त्यांनाच मानस आहे. त्यांच्या मेहनतीचे फळ आज झाडे २० वर्षांची झाली आहेत. उन्हात या झाडाच्या गर्द सावलीत दुपारी आसरा घेतात.
याबाबत संस्थेच्या वतीने मिळत असलेल्या योगदानामुळेही झाडे जगवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले असून, आज झाडे जगल्याने समाधान वाटत असल्याचे त्र्यंबक तेली यांनी सांगितले. या कामी संस्थाध्यक्ष विजय बडगुजर जातीने लक्ष देतात, असेही सांगितले.