शांतता समितीने सहकार्यासाठी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 09:04 PM2019-03-17T21:04:20+5:302019-03-17T21:06:04+5:30
शांतता समितीच्या सभेत बोलणारे सदस्य प्रत्यक्ष उत्सवाच्यावेळी सहभागी होत नाही. त्यांनी सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी येथे केले.
चाळीसगाव, जि.जळगाव : शांतता समितीच्या सभेत बोलणारे सदस्य प्रत्यक्ष उत्सवाच्यावेळी सहभागी होत नाही. त्यांनी सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी येथे केले.
शिवजयंती, बामोशीबाबा ऊरुस व होळी सणांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बामोशीबाबा दर्गाह परिसरात आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासह मोबाईल टॉयलेट उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी काही सदस्यांनी केली. आगामी काळात होळीसह हिंदू- मुस्लीम बांधवांचा श्रद्धास्थान असलेले पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांचा उर्स व त्याच दिवशी शिव जयंती असा दुध शर्करा योग आला आहे.
शिवजयंती सकाळी साजरी करुन सायंकाळी बाबांची तलवार निघेल. मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हावे. दर्गा ट्रस्टने भाविकांना सुविधा पुरवाव्यात, स्वंसेवकांची नेमणुक करावी, अफवा पसरवू नये, भावना दुखावतील अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये. तसेच सण उत्सव सर्वांनी मिळून साजरे करावे, असेही बच्छाव म्हणाले.
यावेळी डीवायएसपी नजीर शेख यांनी शिवजयंती सकाळी साजरी करुन सायंकाळी तलवार मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे सांगून पोलीस प्रशासन या काळात दक्ष असेल असे आश्वासन दिले.
व्यासपीठावर प्रदीप देशमुख, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहरप्रमुख श्यामलाल कुमावत, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, आनंदा कोळी, रामचंद्र जाधव, श्याम देशमुख, आनंद खरात, किसनराव जोर्वेकर, दिलीप घोरपडे, अल्लाउद्दीन शेख, हाजी गफूर, दिलावर मेंबर, सपोनि आशिष रोही, सुरेश शिरसाठ, पोउनि मछिंद्र रणमाळे, राजेश घोळवे, युवराज रबडे आदींसह शांतता समिती सदस्य उपस्थित होते. यशस्वितेसाठी गोपनीय शाखेचे गणेश पाटील, पंढरीनाथ पवार यांनी सहकार्य केले.