नेरी ते पद्मालय पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 03:54 PM2019-12-01T15:54:01+5:302019-12-01T15:55:16+5:30
राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता यावी म्हणून श्रीक्षेत्र पद्मालय येथील गणपतीला पायी चालत येण्याचा नवस फेडण्यासाठी येथील महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चक्क नेरी ते पद्मालय पायीयात्रा काढली होती.
नेरी, ता.जामनेर, जि.जळगाव : राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता यावी म्हणून श्रीक्षेत्र पद्मालय येथील गणपतीला पायी चालत येण्याचा नवस फेडण्यासाठी येथील महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चक्क नेरी ते पद्मालय पायीयात्रा काढली होती. हा उपक्रम पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत कौतुकही केले.
राज्यात गेल्या महिन्यात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता यावी म्हणून येथील नेरीदिगर ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीपाद रामदास पाटील यांनी श्रीक्षेत्र पद्मायल येथील महागणपतीला पायी चालत येण्याचा नवस कबूल केला होता. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यातील जनतेने महिनाभर सत्ता संघर्ष बघितला. परंतु नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना अशा तीनही पक्षांनी महाविकास आघाडीची रचना करत सत्ता स्थापन केली.
विधिमंडळात महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध करताच श्रीपाद पाटील यांनी आपल्या नवस पूर्ण करीत शनिवारी सकाळी येथील म्हसावद चौफुलीवर तयारी सुरू करताच आघाडीतील शिवसेना व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी एकच गर्दी केली. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नेरी ते पद्मालय पायीयात्रा काढून घोषणा देण्यात आल्या. यावेळी अॅड.ज्ञानेश्वर बोरसे, डॉ.मनोहर पाटील, शिवाजी पवार, श्रीपाद पाटील, कैलास पाटील, दिनेश पाटील, पद्मसिंह राजपूत, अशोक कोळी, अरुण पाटील, मधुकर पाटील, नीलेश खोडपे, मनोज पाटील, किशोर खोडपे, अविनाश वाघ, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.
पदयात्रेचे स्वागत
दरम्यान, सकाळी येथून निघाल्यानंतर वावडदा येथील सुमित पाटील यांच्यासह अन्य काही कार्यकत्यार्नी या पदयात्रेचे स्वागत केले. म्हसावद नंतर थेट श्रीक्षेत्र पद्मालय येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय गरुड, विजय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. नेरी ते पद्मालय दरम्यान तीस कि.मी.चे अंतर चालन्यासाठी जवळपास आठ तासांचा कालावधी याठिकाणी लागल्याचे सांगण्यात आले.