पादचारी तरूणाला महामार्गावर कंटेनरने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:01 PM2019-03-17T12:01:29+5:302019-03-17T12:03:15+5:30
अजिंंठा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन
जळगाव : कामाला जाणाऱ्या पादचारी तरूणाला कंटेनरने चिरडल्याची दुर्देवी घटना राष्टÑीय महामार्गावर हॉटेल मानसनजीक शनिवारी सकाळी ९़३० वाजता घडली़ गुफरान खान अजमल खान (वय-२३, रा़ सालार नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे़ या घटनेनंतर संतप्त जमावाने चालकाला बदडून काढले. त्यानंतर चालकासह क्लिनरला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर संतप्त जमावाने अजिंंठा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काहीवेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़
गुफरान खान हा सालार नगरात आई-वडील आणि दोन लहान भावांसोबत वास्तव्यास होता़ दरम्यान, त्याने एमबीएचे शिक्षण राससोनी महाविद्यालयातून नुकतेच पूर्ण केले होते़ त्यानंतर यानंतर गेल्या काही वर्षापासून अयोध्यानगरातील एका दुचाकी शोरूमवर तो सेल्स एक्झीकेटीव्ह म्हणून कामाला होता़ सकाळी साडे नऊ वाजता तो नेहमी प्रमाणे कामावर जाण्यासाठी शनिवारी घरातून निघाला़ सालारनगर ते शोरुम अगदी दहा मिनिटाचा रस्ता आहे. त्यामुळे दररोज तो पायी जायचा़ शनिवारी देखील सकाळी घरातून नऊ वाजता गुफरान हा घरातून निघाला़ मात्र, मानस हॉटेलसमोरून पायी रस्ता ओलांडत असताना त्याला ओडीशा येथून धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव कंटनेरने (क्र.ओ.डी. ०२़एल़४८२६) जोरदार धडक दिली. यात तो खाली कोसळला. पोटावरून कंटनेर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़
नातेवाईकांचा रूग्णालयात आक्रोश
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. खासगी रूग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह रूग्यालयात आणण्यात आला होता. दुपारी सव्वा अकरा वाजता शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाइकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. गुफरान खान हा मनमिळावू स्वभावाचा व कुणाच्याही मदतीला धावून जात असल्याने रुग्णालयात मोठी गर्दीही झाली होती. गुफारान खान याचे वडील अजमलखान हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकआहेत. त्याच्या पश्चात दोन भाऊ उवेश खान, सौद खान तसेच आई असा परिवार आहे.
अजिंठा चौफुलीवर रास्ता रोको
गुफरान खान यांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना दिल्यावर संतप्त जमावाने घटनास्थळी रास्तारोको आंदोलन सुरू केले. अजिंठा चौफुलीवर अचानक येत नागरिकांनी रास्ता रोको केल्याने रस्ताच्या दुर्तफा वाहतूक ठप्प झाली होती. शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देवीदास कुनगर व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. संतप्त जमावाने पोलिसांनी ठोस भुमिका न घेतल्यास दिवसभर आंदोलन करण्याची भुमिका घेतली होती. महामार्गावर गतिरोधक बनविण्यात यावे तसेच महामार्गाजवळ शाळा असल्यामुळे पुढे शाळा आहे, असे फलक देखील लावले नाही, त्यामुळे हे फलक लावावे व त्वरीत महामार्गाच्या कामाला सुरूवात करावी, अशी मागणी संतप्त जमावाकडून करण्यात आली़ यावेळी एमआयएम संघटेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील आंदोलनात सहभागी झाले होते़ जिल्हाधिकारी व नही चे अधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्र संपत्त जमावाने घेतला होता़
संतप्त जमावाने चालकास बदडले... अजिंठा चौफुली ओलाडल्यानंतर कंटेनर चालक छोटू मोहन बागवान (२५, रा़ मध्यप्रदेश) याने नियंत्रण सुटल्याने त्याने समोरून पायी येणाºया गुफरानला चिरडल्यानंतर नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली़ त्यानंतर संतप्त जमावाने चालक छोटू याला कंटेनरमधून बाहेर काढून बदडले़ माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ काही नागरिकांनी गुफरान यास जिल्हा रूग्णालयात हलविले़ मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाºयांनी त्यास मृत घोषित केले़ जमावाने चालक छोटू व क्लिनर गलेसिंग पंदरे (वय-२८, रा़ मध्यप्रदेश) या दोघांना पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले़