एसटी चालकाला मारहाण करणाऱ्या दोघांना दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:16 AM2021-03-27T04:16:25+5:302021-03-27T04:16:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रस्त्याच्या मध्यभागी उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग येऊन बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रस्त्याच्या मध्यभागी उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग येऊन बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी दोघा आरोपींना दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमुजरीचीही शिक्षा जिल्हा न्यायालयाने सुनावली. अनिल भाईदास भोपे व प्रवीण यशवंत सावंत (दोन्ही रा. कासोदा, ता. एरंडोल) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.
एरंडोल डेपोतील एसटी बसचालक प्रवीण सुरेश बडगुजर हे २३ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रवाशांना घेऊन एरंडोल आगारात जात होते. अनिल भोपे व त्याच्या सोबत असलेला प्रवीण सावंत यांनी एरंडोल नगरपालिका बगिचासमोर रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी केली होती. एसटी बस सायंकाळी ५.४५ वाजता बगिचाजवळून गेली. त्यावेळी चालक बडगुजर यांनी भोपे व सावंत यांना रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग येऊन दोघांनी बस चालकास बाहेर ओढून बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली. त्यानंतर बस चालकाच्या तक्रारीनंतर एरंडोल पोलिसांत मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहा साक्षीदार तपासले
याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायाधीश एस.एम. माने यांच्या न्यायालयात खटला चालला. त्यात सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले. अखेर शुक्रवारी न्यायालयाने अनिल भोपे व प्रवीण सावंत यांना भादंवि कलम ३५३, ३२३ व ५०४ नुसार दोषी ठरवून त्यांना दंडांची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीचीही शिक्षा ठोठावली आहे.
अशी आहे शिक्षा
दोन्ही आरोपींना भादंवि कलम ३५३ नुसार प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची कैद तसेच कलम ३२३ प्रमाणे प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी व कलम ५०४ नुसार प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरीची कैद अशी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, दंडाच्या रकमेतून फिर्यादीस २५ हजार रुपये देण्याचेही आदेश न्यायालयाने केले आहेत. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.