कोविड रुग्णालयाची लोकांना भीती नाही, परिस्थितीत बदल - डॉ़ दत्तात्रय बिराजदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 01:38 PM2020-07-12T13:38:38+5:302020-07-12T13:38:57+5:30
साहित्य, सहायक आले, रुग्णांची काळजी
मुबलक साहित्य, रुग्णांना सहकार्यासाठी पूर्ण वेळ साहाय्यक, अशा विविध पातळ्यांवर उपाययोजना झाल्या असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत लोकांच्या मनात किंचितही भीती राहिलेलेली नाही, स्वत: आम्ही रुग्णांशी बोलून हे जाणून घेत असतो़ अशी माहिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ दत्तात्रय बिराजदार यांनी दिली़ ‘लोकमत’ने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बदलेली परिस्थिती मांडली.
प्रश्न : गंभीर घटना घडल्यानंतर हे पद आले काय वाटते ?
डॉ़ बिराजदार : ज्या काही घटना घडल्या त्या अत्यंत दुर्दैवी होत्या़ त्यात कारवाईही झाली, मात्र, सर्वच डॉक्टर हे पूर्ण मेहनतीने काम करीत होते. यात शंका नाही़
मात्र, जे झाले ते दुर्दैवी आहे़ अशा स्थितीत ही जबाबदारी आली आहे़ अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक रुग्णांवर लक्ष ठेवणे, प्रत्येकाच्या समस्या समजून घेणे, या बाबी या रुग्णालयात कटाक्षाने पाळल्या जात आहे़
प्रश्न : तुम्ही छाती विकारांचेही तज्ज्ञ आहात त्याचा कसा उपयोग होतो?
डॉ़ बिराजदार : कोरोनात रुग्णांना नेमकया काय अडचणी आहेत, त्या कशा सोडविल्या पाहिजे, याबाबत राऊंड घेत असतानाच डॉक्टरांना जागीच मार्गदर्शन करणे सोपे होते़ रुग्णांवर उपचार करणे सोपे जाते़
सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा राऊंड असतो, यात केवळ परिस्थिती न बघता रुग्णांची स्थिती त्याबाबतची सर्व माहिती शिवाय सर्व कक्षांमधील अन्य बाबींची बारकाईने पाहणी, या प्रशासकीय बाबीस वैद्यकीय कामही सोबतच होत असल्याने या राऊंडमध्ये अशी दुहेरी जबाबदारी एका वेळी पार पाडण्यास मदत होते़
मृत्यूदर घटला आहे का? त्यासाठी उपाययोजना काय केल्या व आवश्यकता काय आहे?
डॉ़ बिराजदार : १२ ते १३ टक्क्यांवर गेलेला मृत्यूदर आजच्या घडीला साडे पाच टक्क्यांवर आहे़ रुग्णालयातील २५० बेड हे सेंट्रल आॅक्सिजन सिस्टीम अंतर्गत आहेत़ तब्बल ७० व्हेंटीलेटर्स रुग्णालयाला उपलब्ध झाले आहेत़ ज्या बेडवर रुग्णांला व्हेंटीलेटर्सची गरज त्या ठिकाणी ते पुरविले जाते़ याचा अर्थ सर्वच बेड हे आयसीयू अंतर्गत आहे, असे म्हणता येईल़ बेड साईड अस्टिंट नेमण्यात आले आहे़ ते जागेवरच सर्व सुविधा अत्यवस्थ रुग्णांना देत आहे़ या सर्व बाबींनी मृत्यूदर कमी होत आहे़ मध्यम स्वरुपाच्या रुग्णांसाठी शहरात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर असावे, यामुळे गंभीर रुग्णांवर अधीक लक्ष केंद्रीत करता येईल़
क्वारंटाईन करणे म्हणजे जेल नव्हे, तो उपचाराचा व पुढील गंभीर बाबी टाळण्याचा एक भाग आहे़ रुग्ण व नातेवाईकांनी याला न भीता समोर यावे, कोविड रुग्णालयात रुग्ण स्वत: हून येतात त्यांना आता भीती नाही़
- डॉ़ दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय