गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीला येणार झळाळी
By विजय.सैतवाल | Published: March 21, 2023 07:03 PM2023-03-21T19:03:14+5:302023-03-21T19:04:33+5:30
गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर मंगळवार, २१ मार्च सोन्याच्या भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ५९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
जळगाव - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदी वाढून एकट्या सुवर्णनगरी जळगावात २० कोटींच्यापुढे उलाढात होण्याचा अंदाज असून राज्यात हा आकडा तीन ते साडेतीन हजार कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.
गेल्या १० ते १२ दिवसांपासून सोने-चांदीचे भाव वाढत असले तरी सुवर्ण बाजारात खरेदीचा उत्साह कायम आहे. गुढीपाडवा सणाच्या दोन दिवस अगोदरच सोने ६० हजारांच्या पुढे गेल्याने मुहूर्तावर भाववाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी भारतात प्रत्येक सण, मुहूर्ताला महत्त्व दिले जात असल्याने गुढीपाडवा सणाला मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होऊन राज्यात अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर मंगळवार, २१ मार्च सोन्याच्या भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ५९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले. आता मुहूर्तावर काय भाव राहतात याकडे लक्ष असले तरी खरेदी मात्र जोरात होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
कलाकुसरीच्या दागिन्यांना पसंती
सोने खरेदी करताना सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी दिसून येत आहे. मुहूर्तावर खरेदी करायची असल्याने अनेक जण जुने दागिने मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर दागिने करण्यास पसंती देतात. त्यानुसार या प्रकारासह अनेक जण किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी करून ठेवणार असून कलाकुसरीच्या बारीक सोनपोत, कर्णफुले, गव्हाळ मणी, डिझाईनर पँडल या सोबत पुरुषांच्या सोनसाखळीचा सध्या अधिक ट्रेंड असल्याने त्यांची खरेदी वाढू शकते.
असे वाढत गेले सोन्याचे भाव
१० मार्च- ५६,०००
११ रोजी - ५७,५००
१३ रोजी - ५७,८००
१४ रोजी - ५८,१००
१७ मार्च - ५८,५००
१८ मार्च - ५९, ८००
२० मार्च - ६०,२००
सध्या सोने-चांदीचे भाव वाढत असले तरी त्यांना चांगली मागणी असून गुढीपाडवा सणाला आणखी खरेदी वाढणार आहे.
- भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक.