चाळीसगाव तालुक्यात घरकूलसाठी १६ वर्षांपासून ग्रामस्थांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:30 PM2019-01-31T22:30:29+5:302019-01-31T22:30:41+5:30
शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवून ग्रामस्थ थकले
चाळीसगाव : घरकूल योजनेचा लाभ मिळत नसल्याने तालुक्यातील शिंदी, चत्रुभूज तांडा, जुनपाणी या गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. १६ वर्षांपासून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविले तरी त्याची दखल घेतली जात नसल्याने शिंदी येथील ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचे अस्त्र उगारत तब्बल ७५हून अधिक ग्रामस्थ चाळीसगाव येथे उपोषणास बसले. मात्र दुपारी पं.स. सभापतींच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. असे असले तरी आश्वासनाची पूर्तता कधी होणार व खरा लाभ कधी मिळेल, याचीच प्रतीक्षा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शिंदी गावासह चत्रुभूज तांडा, जुनपाणी येथील ग्रामस्थ घरकूल योजनेचा लाभ मिळावा यासाठी भटकंती करीत आहेत. २००२ ते २००७ दारीद्र रेषेखालील सर्वेमध्ये समाविष्ट असणाऱ्या बेघर ग्रामस्थांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. याबाबत ७ रोजी लोकशाही दिनी जिल्ह्याधिकाºयांकडेदेखील दाद मागण्यात आली. मात्र दखल घेतली जात नसल्याने ७५ हून अधिक नागरिक पंचायत समितीच्या प्रांगणात उपोषणास बसले. याबाबत गटविकास अधिकाºयांना निवेदन देण्याबरोबरच लोकशाही दिनीही ग्रामस्थांनी दाद मागितली होती. मात्र घरकुलसाठीच्या मोकळ्या जागेचे सर्वेचे कामही झाले नाही. २००२ पासून लाभ मिळाला नसल्याचे निवेदनात नमूद करीत ग्रामसेवक सतत गैरहजर राहत असल्याने काम रखडले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
या गावातील ग्रामस्थांना घरकुलाचा लाभ का मिळत नाही, या बाबत गटविकास अधिकारी अतुल पाटील यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की येथील ग्रामसेवक पी.आर.तिरमली यांना कामात कसूर केल्याने त्यांना निलंबित केले आहे. असे असले तरी ग्रामस्थांचे कामे रखडले असून पर्यायी व्यवस्था का केली जात नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दुपारी चार वाजता पं.स.सभापती स्मितल बोरसे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी ही प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने पुन्हा राबविण्यासाठी ठराव करण्यात येऊन तो शासनाला पाठविण्यात येईल, असे अश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी उपोषण सोडले. यावेळी पं.स. राष्ट्रवादीचे गटनेते अजय पाटील, पं.स.सदस्या लता दौंड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील उपस्थित होते.