‘अनलॉक’नंतर भुसावळात आज ‘जनता कर्फ्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:25 PM2020-07-20T23:25:13+5:302020-07-20T23:27:05+5:30
लॉकडाऊननंतर अटी, शर्तीवर अनलॉक करण्यात आले. व्यापारी संघटनेला विश्वासात घेऊन शहरात मंगळवार व शनिवार जनता कर्फ्यू म्हणून घोषित करण्यात आले आहे.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : लॉकडाऊननंतर अटी, शर्तीवर अनलॉक करण्यात आले. व्यापारी संघटनेला विश्वासात घेऊन शहरात मंगळवार व शनिवार जनता कर्फ्यू म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार, २१ जुलै रोजी पहिला जनता कर्फ्यू असेल. या दरम्यान कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक, कठोर कारवाई पालिका प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. यासाठी सहकार्य करून कोरोनाला पळवून लावण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सूचनेनुसार ७ ते १३ जुलैपर्यंत सक्तीचे लॉकडाऊनचे सक्तीने पालन केल्यानंतर शहर १४ पासून शहर अटी व शर्तीवर अनलॉक करण्यात आले आहे. बाजारपेठ परिसरातील सहा ठिकाणी नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आले. अनलॉकमध्ये आठवड्यातून दोन दिवस जनता कर्फ्यू करण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या चर्चेदरम्यान मंगळवार व शनिवार हे दिवस जनता कर्फ्यूचे ठरले. २१ रोजी मंगळवारी पहिला जनता कर्फ्यू पाळण्यासाठी पोलीस प्रशासनासह पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. २० रोजी सायंकाळी पालिका प्रशासनातर्फे शहरामध्ये जनता कर्फ्यूसंदर्भात उद्घोषणा करण्यात आली.
मंगळवारी व्यापाऱ्यांचा आधीपासूनच असतो बंद
मंगळवार हा दिवस व्यापारी असोसिएशन संघटनेतर्फे पूर्वीपासूनच बंद ठेवण्यात येतो. यामुळे मंगळवार हा दिवस व्यापाºयांसाठी फारसा जड जाणार नाही. याशिवाय दुसरा दिवस शनिवार जनता कर्फ्यू म्हणून पाळण्यात येणार आहे.
नो व्हेईकल झोनसाठी बॅरिकेटिंग
लॉकडाऊननंतर शहर अनलॉक झाल्यानंतर बाजारात गर्दी होऊ नये यासाठी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने आठवडे बाजार, नरसिंह मंदिर, कपडा मार्केट, सराफ बाजार, मॉडल रोड, ब्राह्मण संघ परिसर, मुख्य बाजारपेठेचा भाग ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याठिकाणी पालिका प्रशासनातर्फे ३५ ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. याशिवाय तीन ठिकाणी मुव्हेबल बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. यात डॉ.आंबेडकर पुतळा, अमर स्टोअरजवळ तसेच भारत मेडिकल बाजारपेठ या ठिकाणी मुव्हेबल बँरीकेटिंग करण्यात आली आहे.
मास्क नसल्यास जागेवरच १०० रुपये दंड
कोरोना संसर्ग आटोक्यात यावा यासाठी मास्क न वापरणाºया नागरिकांना प्रशासनातर्फे जागेवरच १०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सोशल मीडियावरही होतेय जनता कर्फ्यूचे आवाहन
महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या डॉन या भूमिकेतून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. डॉनला पकडणे मुश्किलच नाही तर नामुमकीन होते, त्याच डॉनला कोरोनाने पकडले. आपणही आपल्या परिवारासाठी घरीच थांबा. उगाच डॉन बनून बाजारात फिरू नका, असे सूज्ञ नागरिक सोशल मीडियाद्वारे जनता कर्फ्यू सक्तीने पाळावा याकरिता पोस्ट टाकत आहे.
पोलिसांची राहील शहरात गस्त
जनता कर्फ्यू दरम्यान कोणीही नियमाचे उल्लंघन करू नये याकरिता नेहमीप्रमाणे पोलीस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी गस्त घालण्यात येणार आहे. कोणीही नियमाचे उल्लंघन करू नये, असे आवाहन डीवायएसपी गजानन राठोड यांनी जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर भुसावळकरांना केले आहे.