यावल पालिकेच्या करवाढी विरोधातील हरकतींवर नागरिकांचे म्हणणे घेतले ऐकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:45 AM2018-12-01T01:45:57+5:302018-12-01T01:46:57+5:30
यावल शहरवासीयांच्या मालमत्ता करावर येथील पालिकेकडून प्रस्तावित असलेल्या पाच टक्के करवाढीविरूध्द ४३२ नागरिकांकडून आलेल्या हरकतींवर नगररचना विभागाचे प्रभारी नगररचनाकार दिव्यांक सोनवणे व बी. आर. बाविस्कर यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.
यावल, जि.जळगाव : शहरवासीयांच्या मालमत्ता करावर येथील पालिकेकडून प्रस्तावित असलेल्या पाच टक्के करवाढीविरूध्द ४३२ नागरिकांकडून आलेल्या हरकतींवर नगररचना विभागाचे प्रभारी नगररचनाकार दिव्यांक सोनवणे व बी. आर. बाविस्कर यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करावर पाच टक्के करवाढ सुचविण्यात आली होती. ती करवाढ या वर्षापासून लागू करण्यासाठी पालिकेने नागरिकांकडून मागविलेल्या हरकती अंतर्गत ४३२ जणांनी हरकती घेतल्या आहेत. या हरकतीवर शुक्रवारी येथील नगरपालिकेच्या सभागृहात प्रभारी नगररचनाकार दिव्यांक सोनवणे व बी. बार. बाविस्कर यांनी नागरिकांकडून आलेल्या हरकतींवर त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. या वर्षात दुष्काळी स्थिती असल्याने आणि शहरातील बहुतेक नागरिक शेतकरी असल्याने या वर्षात पालिकेने करवाढ करू नये, असे हरकतदारांचे म्हणणे पडले.
पालिकेतील विरोधी गटनेते तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राकेश कोलते, काँग्रेसचे शेख असलम शेख नबी, देवयानी महाजन, रुखमाबाई भालेराव-महाजन, नौशाद तडवी, पोर्णिमा फालक यांनी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना यापूर्वीच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बहुतेक नागरिक शेतकरी, शेतमजूर आहेत. या वर्षी दुष्काळाची झळ बसलेली असताना पालिकेकडून करवाढ करून नागरिकांना दुष्काळात तेरावा महिना लागू करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हरकतीवरील विविध बाबी पडताळून पाहून साधारणत: पुढील मैिन्यात करवाढीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगररचनाकर सोनवणे यांनी सांगितले.