लोकसहभागातून पथराड जि.प.शाळा झाली डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 11:20 PM2018-10-07T23:20:52+5:302018-10-07T23:30:03+5:30
पथराड जि.प.शाळेचे शिक्षक नंदू पाटील यांनी शाळा डिजीटल करण्याच्या केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत पुढाकार घेतला. लोकवर्गणीच्या माध्यमातून नागरिकांनी या शाळेचा कायापालट केला.
कजगाव : पथराड जि.प.शाळेचे शिक्षक नंदू पाटील यांनी शाळा डिजीटल करण्याच्या केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत पुढाकार घेतला. लोकवर्गणीच्या माध्यमातून नागरिकांनी या शाळेचा कायापालट केला. विद्यार्थ्यांना चित्रस्वरूपात अभ्यासक्रम अभ्यासता यावा यासाठी शाळेची संरक्षक भिंत रंगविण्यात आली.
पथराड जि.प.शाळेचे शिक्षक नंदू पाटील यांनी शाळा डिजिटल व्हावी यासाठी मुख्याध्यापकांच्या मदतीने लोकनियुक्त सरपंच व भाऊसाहेब पाटील यांची भेट घेतली. शाळा डिजिटल करण्यासाठी सरपंचांनी मदत करण्याची तयारी दर्शविली.
त्यानंतर तालुक्यातील गुढे येथील डिजिटल शाळेला भेट देण्यात आली. याठिकाणी असलेल्या प्रोजेक्टरची कल्पना पदाधिकाऱ्यांना आवडली. त्यानंतर दोन दिवसात पालक सभा घेण्यात आली. त्यात लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळा डिजिटल करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी प्रकाश धुमाळ, दादा पाटील, भाऊसाहेब पाटील यांनी प्रत्येकी ५००१ रुपयांची रोख रक्कम दिली. त्यानंतर उपस्थित पालकांनी आपापल्या परीने मदत केली. यानिमित्ताने २६ हजार रुपये रोख स्वरूपात जमा झाले. त्यानंतर उपस्थितांनी रोटरी क्लब चाळीसगावच्या पदाधिकाºयांची भेट घेतली. त्यांनी इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचा अभ्यासक्रम देण्याचे कबूल केले.
एक महिन्यानंतर रोटरी क्लबने प्रोजेक्टर शाळेस दिला आणि आज शाळेतील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाचे धडे शाळेत गिरवू लागले.
ग्रामपंचायतीला आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळेच्या संरक्षक भिंतीची उंची वाढविण्यात आली. प्रत्येक वर्गाच्या भिंतीवर आकर्षण चित्रे व अभ्यासक्रम रेखाटण्यात आला. शालेय इमारतीच्या बाहेरील भिंतीवर पण आकर्षक चित्रे काढण्यात आले. या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पाटील, सरपंच रंजना पाटील, मुख्याध्यापक एस.एफ . पाटील व शिक्षक नंदू पाटील, संजय पाटील यांनी पुढाकार घेत तो पूर्ण केला.