अमळनेरकरांच्या सुरक्षेसाठी लोकप्रतिनिधी आले एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 04:36 PM2017-12-01T16:36:44+5:302017-12-01T16:40:19+5:30
दोन्ही आमदार व नगराध्यक्षांच्या पुढाकाराने शहरात बसणार शंभर सीसीटीव्ही कॅमेरे
आॅनलाईन लोकमत
अमळनेर,दि.१- आरोप-प्रत्यारोपांची एकही संधी न सोडणारे लोकप्रतिनिधी ज्यावेळी ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्र येतात त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना सुखद धक्का बसतो. अमळनेरातील दोन्ही आमदार व नगराध्यक्षांनी शहरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून शहरात चोºया, घरफोड्या, गर्दीच्या ठिकाणाहून वाहनांची चोरी असे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी बँकांमधून पैसे काढल्यानंतर ग्राहकांकडून लंपास करणे, सोनसाखळ्या लंपास करणे आदी प्रकार वाढले होते. मुलींची छेडखानी, अवैध पार्किंग यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे अनेक महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे. मात्र निधीअभावी हे काम प्रलंबित होते. पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मागणीनुसार शहरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी १० लाख रुपये , आमदार स्मिता वाघ यांनी ५ लाख रुपये व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी नगरपालिकेतर्फे ५ लाख रुपये असा २० लाखांचा निधी देण्यासाठी सहमती दर्शविली आहे.
शहरात बसस्थानक, बाजारपेठ, मुख्य बँक, शाळा, वर्दळीच्या ठिकाणी १०० कॅमेरे लावण्यात येणार आहे. त्याचे कंट्रोल युनिट पोलीस स्टेशनला राहणार आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातून पोलिसांना शहरातील हालचाली टिपता येणार आहे. वाहन चोर , सोनसाखली लांबवणारे, रात्री चोºया करणारे तसेच टवाळखोरांचे चित्रिकरण घेण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी सर्वच विकासकामांसाठी एकत्र आल्यास तालुक्याचा विकास निश्चित होईल अशा भावनाही अनेकांनी व्यक्त केली.