गिरणा धरणाचा टक्का वाढतोय; पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:24+5:302021-09-25T04:16:24+5:30
संजय हिरे खेडगाव, ता. भडगाव : मागील तीन वर्षे ऑगस्टमध्येच गिरणा धरणातील जलसाठ्याने शंभरी गाठली होती. यावर्षी ...
संजय हिरे
खेडगाव, ता. भडगाव : मागील तीन वर्षे ऑगस्टमध्येच गिरणा धरणातील जलसाठ्याने शंभरी गाठली होती. यावर्षी मात्र पावसाळ्यात अद्यापपावेतो २४ तासांत फक्त अर्धा ते एक टक्का वाढ नोंदवीत शंभरीसाठी तिष्ठत ठेवत आहे.
यावर्षी सर्वदूर चांगला पाऊस झाला. खान्देशात बहुतांश धरणांनी शंभरी गाठली. गिरणा धरण या स्पर्धेत मागे पडले आहे. शुक्रवारी सकाळी गिरणा धरणात ७०.७३ टक्के जलसाठा होता, तो ७५ टक्क्यांच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मागील तीन वर्षांत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गिरणा धरणाच्या वरील भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनद मिळून पंधरा ते तीस हजार क्युसेकपर्यंत विसर्ग खाली गिरणा धरणात होई. एका दिवसात किंवा चोवीस तासांत चार टक्क्यांपासून सात-आठ टक्के अशी जलसाठ्यात भर पडत होती.
यावर्षी त्या भागात नाशिक जिल्ह्याच्या इतर तालुक्यांच्या मानाने पर्जन्यमान सुरुवातीपासूनच कमी राहिले. वरील धरणे आता भरली आहेत. पावसाचे प्रमाणदेखील सातत्यपूर्ण व जोरदार असे राहिले नाही. परिणामी संपूर्ण पावसाळ्यात वरच्या धरणांतून गिरणा धरणात होणारा पाण्याचा विसर्ग दहा हजारांच्या वर गेला नाही. एरव्ही ऑगस्टमध्ये शंभरी गाठणारे धरण यावर्षी पन्नाशी गाठू शकले नाही. गिरणा धरण जलसाठ्यात सप्टेंबरमध्ये आजवर पंचवीस टक्के वाढ झाली. मागच्या दहा दिवसांत २४ तासांत एक-दीड टक्का झालेली वाढ हेच वैशिष्ट्य यावेळेस ठरले. त्याआधी अर्धा ते एक टक्का वाढच २४ तासांत नोंदली गेली. यावर्षी मन्याड, बोरी आदी धरणांनी गिरणाला केव्हाच मागे टाकत शंभरी गाठली. आता गिरणा धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांच्या दिशेने वाटचाल करीत असला तरी सिंचनाच्या दृष्टीने आवर्तन मिळेल की नाही, ही धाकधूक कायम आहे.
मिळाले तर एक पाणी..
यात कमी पाण्यात येणारे हरभरा, दादर आदी सर्वच पिके अर्ध्यातच दम सोडतात. म्हणून गिरणा धरणाच्या वरच्या भागात एक चांगला मुसळधार, कोसळधार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा केली जात आहे.