पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:32 AM2020-12-16T04:32:41+5:302020-12-16T04:32:41+5:30
जळगाव : जिल्ह्यातील १५०२ गावांची अंतिम पैसेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, ही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याची माहिती ...
जळगाव : जिल्ह्यातील १५०२ गावांची अंतिम पैसेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, ही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. गत दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले झाल्याने पैसेवारी ५० पैसांपेक्षा अधिक आली आहे.
गत दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात १०० टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. प्रत्येक वर्षी दुष्काळाच्या दृष्टीने पैसेवारी निश्चित केली जाते. नजर पैसेवारी, सुधारित पैसेवारी आणि अंतिम पैसेवारी अशा तीन टप्प्यांत ही पैसेवारी घेतली जाते. स्थानिक ठिकाणची पीक परिस्थिती पाहून ही पैसेवारी निश्चित केली जात असते. यंदा दुष्काळाचे निकष बदलले असले तरी त्याचाच एक भाग म्हणून पैसेवारी निश्चित करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात १५०२ गावे असून, या सर्व गावांची पैसेवारी ही ५० पैसांपेक्षा अधिक आहे. पैसेवारी अधिक असल्याने दुष्काळाची परिस्थिती नसल्याचे मानले जात आहे.
अशी आहेत गावे
जळगाव-९२, जामनेर १५३, एरंडोल ६५, धरणगाव ८९, पारोळा ११४, भुसावळ ५४, बोदवड ५१, मुक्ताईनगर ८१, यावल ८४, रावेर १२०, पाचोरा १२९, भडगाव ६३, अमळनेर १५४, चोपडा ११६, चाळीसगाव १३७ असे एकूण १५०२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे.