खान्देशात १३०० थकबाकीदारांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:28+5:302021-02-10T04:16:28+5:30
जळगाव : महावितरणतर्फे दिलेल्या मुदतीत वीज बिलाचा भरणा न केल्याने खान्देशातील तब्बल १३०० ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला आहे. ...
जळगाव : महावितरणतर्फे दिलेल्या मुदतीत वीज बिलाचा भरणा न केल्याने खान्देशातील तब्बल १३०० ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला आहे. तर १ हजार ४६० ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
कोरोनामुळे महावितरणतर्फे शासनाच्या सूचनेनुसार घरोघरी जाऊन रीडिंग न घेता, ग्राहकांना जूनपर्यंत सरासरी बिले देण्यात आली. मात्र, महावितरणतर्फे देण्यात आलेली सरासरी बिले ही अवाजवी असल्याचे सांगत, हजारो ग्राहकांनी बिलांबाबत महावितरणकडे तक्रारी केल्या. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे ठिकठिकाणी तक्रार निवारण शिबिरे घेऊन, अनेकांच्या तक्रारींचे निवारही करण्यात आले. मात्र, तरीदेखील नागरिकांनी बिलाचा भरणा करण्याकडे पाठ फिरविली आहे. जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्हा मिळून महावितरणची तब्बल १३०० कोटींच्या वर थकबाकी झाली आहे. यामध्ये सर्वांधिक ६६० कोटींची थकबाकी एकट्या जळगाव जिल्ह्यात असून, त्या खालोखाल धुळे जिल्ह्यात ३७८ कोटींची थकबाकी तर नंदुरबार जिल्ह्यात ३०१ कोटींची थकबाकी आहे.
त्यानंतर महावितरणतर्फे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडील पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या थकबाकीबाबत आतापर्यंत ४ लाख ११ हजार थकबाकीदारांना नोटिशी बजावल्या आहेत.
मुदत संपूनही थकबाकी न भरल्याने कारवाई
ग्राहकांना महावितरणतर्फे हप्त्याने वीजबिल भरण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र तरीदेखील ज्या ग्राहकांनी दिलेल्या मुदतीत वीजबिल भरले नाही, अशा ग्राहकांवर महावितरणतर्फे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
`त्या` ग्राहकांना वीज जोडणीसाठी नव्याने अर्ज करावा लागणार
महावितरण प्रशासनाने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, पथदिवे व सार्वजनिक पुरवठ्याची थकबाकी असलेल्या जळगाव परिमंडळातील सुमारे १३०० ग्राहकांचे वीजमीटर काढून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला आहे. यामध्ये लॉकडाऊन काळातील वीजबिलासह गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर थकबाकी थकविलेल्या ग्राहकांचा समावेश आहे. वीजमीटर काढलेल्या ग्राहकांना थकबाकी भरली तरी, तत्काळ वीजपुरवठा सुरळीत न करता नवीन विजेची जोडणी करण्यासाठी नव्याने महावितरणकडे अर्ज करावा लागणार आहे.