भाजप कार्यालयात अधिकाऱ्यांनी लावलेल्या उपस्थितीचे स्थायीत पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:16+5:302021-02-26T04:22:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या स्थायी समितीआधी नियोजनासाठी भाजप नगरसेवकांची पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत मनपा अधिकाऱ्यांनी लावलेल्या हजेरीवरून ...

The permanent repercussions of the presence of officials in the BJP office | भाजप कार्यालयात अधिकाऱ्यांनी लावलेल्या उपस्थितीचे स्थायीत पडसाद

भाजप कार्यालयात अधिकाऱ्यांनी लावलेल्या उपस्थितीचे स्थायीत पडसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेच्या स्थायी समितीआधी नियोजनासाठी भाजप नगरसेवकांची पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत मनपा अधिकाऱ्यांनी लावलेल्या हजेरीवरून गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत चांगलेच पडसाद उमटले. शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी या प्रकारच्या पायंड्याचा निषेध व्यक्त करत, प्रशासनाने याबाबत भूमिका निश्चित करण्याची मागणी केली. तसेच हा प्रकार मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा असून, प्रशासनाने याबाबत दखल घेण्याचीही मागणी लढ्ढा यांनी केली.

मनपाच्या अंदाजपत्रकाची सभा संपल्यानंतर मनपा स्थायीची नियमित सभा सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत एकूण ६ विषय ठेवण्यात आले होते. यामध्ये आयत्यावेळचे विषयच जास्त गाजले. नितीन लढ्ढा यांनी भाजप कार्यालयात मनपा अधिकाऱ्यांनी लावलेल्या हजेरीवरून मनपा प्रशासनाला चांगलेच खडेबोल सुनावले. त्यावर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी विरोध करत हा पायंडा खाविआच्या काळापासूनच असल्याचे सांगत लढ्ढा यांना विरोध केला.

नगरसेविका पतीकडून मनपा अधिकाऱ्याचा अपमान

नितीन लढ्ढा यांनी सभागृहात सांगितले की, मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापौर, उपमहापौर यांच्या दालनात बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतल्यास हे नियमात बसते. मात्र, अनधिकृत बैठकीत पक्ष कार्यालयात अधिकाऱ्यांना बोलाविले जाते. त्या बैठकीत नगरसेविकेच्या पतीकडून एका मोठ्या अधिकाऱ्याला झापले जाते, त्यांचा अपमान केला जातो. हा प्रकार मनपा अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा असून, अनेक अधिकाऱ्यांनी या प्रकाराला कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा विचार केला असल्याचा धक्कादायक आरोप नितीन लढ्ढा यांनी या सभेत केला.

रस्त्यांच्या कामांची चौकशी कार्यालयातच बसून

शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाबाबत शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी तक्रार करत ऑगस्ट महिन्यात झालेल्या सभेत चौकशी करण्याची मागणी केली होती. मनपाकडून सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवाल बरडे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत बरडे यांनी मनपा अभियंत्यांच्या कामाच्या पध्दतीवर नाराजी व्यक्त करून, सर्व चौकशी मनपाच्या कार्यालयातच बसून केली असून, प्रत्यक्ष ठिकाणावर न जाताच ही चौकशी केल्याचा आरोप बरडे यांनी केला.

अनुकंपाधारकांच्या भरतीबाबत समिती स्थापन

मनपातील अनुकंपाधारकांचा भरतीचा मार्ग मोकळा झाला असला तरी याआधी २०१७ मध्ये देखील शासनाने अनुकंपाधारकाच्या भरतीचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही मनपाने भरती केली नव्हती. त्यामुळे यावेळी आदेशानंतर तरी प्रशासनाने लक्ष देऊन व शासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्याची मागणी नितीन लढ्ढा यांनी केली. त्यावर आयुक्तांनीही तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

Web Title: The permanent repercussions of the presence of officials in the BJP office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.