मनपाच्या माजी पदाधिकाऱ्याच्या हॉटेलचा परवाना कायमस्वरुपी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:42 PM2020-05-16T12:42:03+5:302020-05-16T12:43:04+5:30
हॉटेल ‘पांचाली’मधील मद्यसाठ्यात तफावत
जळगाव : लॉकडाउनमध्ये मद्याची तस्करी केल्याप्रकरणी प्रभात चौकातील हॉटेल पांचालीचा परवाना रद्द करण्यात आला असून तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे. या हॉटेलचा परवाना मनपाच्या माजी महिला बाल कल्याण सभापती भारती जाधव यांच्या नावाने आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या पूर्वीच या परवानाधारकावर विभागीय गुन्हा दाखल केला आहे.
शनी पेठ पोलिसांनी २६ एप्रिल रोजी कोंबडी बाजार परिसरात एका कारचा पाठलाग करुन ८८ हजार रुपये किमतीची विदेशी दारू पकडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ही दारू कोठून आली याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता प्रभात चौकातील हॉटेल पांचाली येथून हा साठा आल्याचे उघड झाले होते. त्यामुळे २८ एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती कळविली. यानुसार पथकाने हॉटेलमधील मद्यसाठ्याची तपासणी केली असता त्यात ६५० मिलीच्या बियर व ९० मिलिच्या विदेशी दारुच्या बाटल्यांची तफावत आढळून आली होती. तसेच हॉटेलमध्ये आढळून आलेल्या मद्याच्या बाटल्यांची नोंद रजिस्टरमध्ये नव्हती. त्यामुळे हा विभागीय गुन्हा दाखल करुन हॉटेल सील करण्यात आले होते. त्या वेळी परवानाधारकांचे पती अजय जाधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आत्ताच काही सांगता येणार नाही असे सांगत समाधानकारक उत्तर दिले नव्हते. तसा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यानुसार परवाना रद्द करण्यात आला.