दंगेखोरांचा कायमचा बंदोबस्त करा : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:33 PM2020-03-24T17:33:34+5:302020-03-24T17:33:40+5:30
टिव्ही सिरीयलप्रमाणे दर ५ वर्षांनी दंगली !
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : सबंध जगावर कोरोना सारख्या भयावह आजाराचे संकट घोंघावत असतांना नेहमीच्या पाच पंचवीस जणांच्या टोळक्यांनी धुडघूस घालून दंगली घडवून सामान्य जनतेला वेठीस धरण्याची बाब निंदनीय असून, आता समाजधुरीणांनीही याबाबतीत गांभीयार्ने दखल घेणे गरजेचे आहे. तथापि, रावेर शहरात दर पाच वर्षांनी एखाद्या टी व्ही सिरीयलप्रमाणे होत असलेल्या दंगली थांबवण्यासाठी दंगेखोरांचा कायमचा बंदोबस्त होईल अशी कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना दिल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आमदार चंद्रकांत पाटील व आमदार शिरीष चौधरी त्यांच्यासमवेत उपस्थित होते. रावेर शहरात जातीय दंगलीमुळे संचारबंदी लागू असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरातील दंगलग्रस्त भागात व मयताच्या कुटूंबीयांची भेट देण्याचे टाळले.
दरम्यान मयताच्या कुटूंबीयांना शासनाकडून काही मदत देता येईल का ? यासंबंधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मदत तथा पुनर्वसन मंत्री यांच्याशी बोलून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना तालूका संघटक अशोक शिंदे यांनी घरोघरी दुध वाटप करण्यासाठी मुभा द्यावी अशी मागणी केली असता, कोरोनाच्या संचारबंदीत व हिंसक दंगलीच्या संचारबंदीत मोठी तफावत असते. जीवनाशी निगडित रूग्णवाहीका, अग्निशमन बंब वा वैद्यकीय सेवा यांनाच माणूसकीच्या भावना गृहीत धरून सवलत देण्यात येत असते. अन्यथा संचारबंदी ही निर्मनुुष्य मानली जाते असे उगले यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, कामगार नेते दिलीप कांबळे, गोपाळ सोनवणे, मनोहर खैरनार, भागवत पाटील, डी. के. महाजन, रामदास पाटील, विकास महाजन, राष्ट्रवादी किसान सभेचे सोपान पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन महाजन, नगरसेवक आसिफ मोहंमद, गयास शेख, आदी उपस्थित होते.