भुसावळ येथे सिंधी समाजाच्या लग्नकार्यात मोजक्याच मेनूची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:42 PM2018-12-02T22:42:26+5:302018-12-02T22:43:40+5:30
भुसावळ येथील सिंधी समाज बांधवांतर्फे सिंधी कॉलनीतील झुलेलाल मंदिरात बैठक झाली. त्यात लग्नकार्यामध्ये पारंपरिकऐवजी फक्त मोजके मेनू राहतील. यामुळे अवाजवी खर्च व अन्नाची बचत होईल, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
भुसावळ, जि.जळगाव : येथील सिंधी समाज बांधवांतर्फे सिंधी कॉलनीतील झुलेलाल मंदिरात बैठक झाली. त्यात लग्नकार्यामध्ये पारंपरिकऐवजी फक्त मोजके मेनू राहतील. यामुळे अवाजवी खर्च व अन्नाची बचत होईल, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
सिंधी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. लग्नकार्यात अनेक खाद्यपदार्थांचा वापर होतो. यामुळे अन्नही वाया जाते. तसेच अवास्तव खर्चही होतो. परिणामी यातून अन्न व पैशांची बचत व्हावी याकरिता लग्नकार्यामध्ये सकाळी फराळात फक्त सात, दुपारी अकरा, रात्री पंधरा पदार्थ राहतील. यापेक्षा जास्त मेनू वापरता येणार नाही, असा अध्यादेश समाजबांधवांनी एकमताने मंजूर केला.
नियम मोडल्यास फक्त लग्नात जेवणाविना उपस्थिती
समाजबांधवांच्या बैठकीत एकमताने मंजूर झालेला नियम हा सर्वांसाठी बंधनकारक आहे. यास कोणी मोडल्यास त्याच्या लग्नकार्यात फक्त समाजबांधव लग्न लावून लावण्यापुरता जातील. तेथे भोजनाचा एक घासही घेणार नाही, हा नियम सर्वांना पाळणे बंधनकारक आहे.
या कारणासाठी झाला निर्णय
लग्नकार्यामध्ये कोणीही पाच ते सहापेक्षा जास्त मेनू घेत नाही. उरलेले मेनू तसेच पडून राहतात. यामुळे अन्नाचे नुकसान होते व अवाजवी पैसा खर्च होतो. तसेच अगणित मेनू प्रत्येकाला शक्यही होत नाही. यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीला बाबा सुनील कुमार संतोष तलरेजा, अशोक मनवानी, मनोहर जाडवाणी, संजीव अहुजा, मुरली लेखराजाणी, मनोहर सोढाई, पेहलाज गुरुबक्षवानी, सुरेंद्र वासवानी, रमेश नागरानी, ग्यानचंद लेखवाणी, रमेश अथवाणी, निकी बत्रा बसंतानी, त्रिलोक मनवानी व समाजबांधव प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.