जळगाव मनपा क्षेत्रात मद्य विक्रीला परवानगी, प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 12:32 PM2020-06-07T12:32:44+5:302020-06-07T12:33:23+5:30

वाईन शॉपसह परमिट रुम, बारमधूनही करता येणार सीलबंद मद्यविक्री

Permission for sale of liquor in Jalgaon Municipal Corporation area | जळगाव मनपा क्षेत्रात मद्य विक्रीला परवानगी, प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम

जळगाव मनपा क्षेत्रात मद्य विक्रीला परवानगी, प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम

googlenewsNext

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान मनपा क्षेत्रात बंद असलेली मद्य विक्री प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतरत्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. या परवानगीमुळे आता ७ जूनपासून मद्यविक्रीची दुकाने सुरु होणार असून ३० जूनपर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत वाईन शॉपसह, परमीट रूम, बार येथेही सीलबंद बाटलीमध्ये मद्य विक्री करता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने जिल्ह्यात मद्यविक्री बंद करण्यात आली होती. गेल्या महिन्यात शासनाने १७ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते तरी मद्यविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी अगोदर ग्रीन व आॅरेंज झोनमध्येच मद्यविक्रीला परवानगी दिली व नंतर शासनाने या निर्णयात बदल करून सर्व ठिकाणी मद्यविक्रीस प्रतिबंधित क्षेत्र वगळता परवानगी दिली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही एक दिवसानंतर परवानगी मिळाली. मात्र त्यानंतर काहीच दिवसात मद्य विक्री बंद करण्यात आली.

अखेर मनपा क्षेत्रातही परवानगी
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता देत रेड झोन (मनपा क्षेत्र) व प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतरत्र मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली. त्यानंतर अनलॉक-१मध्ये ५ जून रोजी इतर व्यवहारांसह मनपा क्षेत्रातही मद्य विक्री सुरू होण्याची अपेक्षा होती. अखेर मनपा क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतरत्र मद्य विक्री दुकाने सुरू करण्याचे आदेश ६ जून रोजी काढण्यात आले.

परमिट रुमलाही सीलबंद मद्य विक्रीस परवानगी
गेल्या महिन्यात मद्यविक्रीला परवानगी देताना केवळ वाईन शॉप सुरू करण्यात आले. मात्र आता वाईन शॉपसह परमिट रुम, बारदेखील सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून तेथून सीलबंद मद्य विक्री करता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परमिट रुम, बारमधूनही सीलबंद मद्य विक्रीची परवानगी मिळण्याची मागणी जिल्हा वाईन डिलर असोसिएशनच्यावतीने करण्यात येत होती.
परमिट रुम, बारमधूनही आता सीलबंद मद्य विक्रीची परवानगी मिळाली असून या निर्णयाचे संघटनेच्यावतीने स्वागत करण्यात येत असून सर्वच मद्यविक्रीच्या ठिकाणी नियमांचे पालन केले जाईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष ललित पाटील यांनी दिली.

Web Title: Permission for sale of liquor in Jalgaon Municipal Corporation area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव