संत मुक्ताई पालखीसोबत १०० वारकऱ्यांना परवानगी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:12 AM2021-06-11T04:12:34+5:302021-06-11T04:12:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने यावर्षी राज्य सरकारने आषाढी एकादशीच्या वारीसाठी १०० वारकऱ्यांना पंढरपूरला पायी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने यावर्षी राज्य सरकारने आषाढी एकादशीच्या वारीसाठी १०० वारकऱ्यांना पंढरपूरला पायी जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी श्रीसंत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्रीसंत मुक्ताईचा पालखी सोहळ्याचे १४ जून रोजी प्रस्थान होणार आहे. यावर्षी सुदैवाने वारी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीअंशी कमी झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आषाढीच्या वारीसाठी पालखी सोहळ्यासोबत १०० वारकऱ्यांना पायी चालत जाण्याची परवानगी द्यावी. वारकरी बांधव शिस्त पाळून पालखी सोहळ्यात सहभागी होतील, असे श्रीसंत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
प्रमुख मानाच्या पालख्यांपैकी एक पालखी
दरवर्षी आषाढी एकादशीच्या वारीसाठी मुक्ताईनगर येथून श्रीसंत मुक्ताई पालखी निघत असते. राज्यातील प्रमुख मानाच्या पालख्यांपैकी एक असलेली संत मुक्ताईच्या पालखीचे राज्यात सर्वप्रथम प्रस्थान होते. पंढरपूरजवळ वाखारी येथे संत मुक्ताईच्या पालखीसोबत श्रीसंत तुकाराम, श्रीसंत ज्ञानेश्वर, श्रीसंत सोपानदेव यांच्या पालख्या भेटतात. नंतर पालख्या एकत्रितपणे पंढरपूरला दाखल होतात.
राज्य सरकारप्रमाणे आमचीही जबाबदारी आहे, हे भान जपत आम्ही वारी पूर्ण करू. वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा कायम राहावी, म्हणून राज्य सरकारने दोन दिवसांत आम्हाला सकारात्मक निर्णय द्यावा, अशी मागणी ॲड. रवींद्र पाटील यांनी केली.