कर्तव्यावर जाण्यासाठी तीन व चारचाकी वाहन वापराची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 12:45 PM2020-07-09T12:45:15+5:302020-07-09T12:45:27+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : विमान प्रवाशांनाही मिळणार मुभा
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इतर रुग्णालये, औद्योगिक वसाहतीमधील कंपनी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना कर्तव्यावर ये-जा करण्यासाठी दुचाकी, तीनचाकीसह चारचाकीने येण्या-जाण्यास मुभा देण्यात आली असून या बाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी आदेश काढले. तसेच विमानप्रवाशांनाही घरापर्यंत चारचाकी वापराची मुभा देण्यात आली आहे.
जळगाव, भुसावळ व अमळनेर मध्ये ७ ते १३ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनसंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात नमूद बाबींसह बुधवार, ८ जुलै रोजी स्पष्टीकरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयात ये-जा करणारे आरोग्य कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेसाठी कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांंना दुचाकी, तीनचाकी व चारचाकीमध्ये कर्तव्यावर ये-जा करण्यास मुभा राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहणार आहे. औद्योगिक वसाहतीमधील कंपनी, उद्योग यांचे मालक, संचालक, कंपनीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयास तांत्रिक सेवा पुरविणारे कंत्राटदार, करारबध्द संस्था, कर्मचारी यांना सेवा पुरवण्यासाठी त्यांच्या संस्थेने दिलेले ओळखपत्र पाहून वाहनांसह संबंधित कार्यालयात ये-जा करण्यास मुभा राहणार आहे.
या पूर्वी लॉकडाऊनसंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात चारचाकी व तीनचाकी वाहन वापरासंदर्भात स्पष्ट निर्देश नव्हते. त्यामुळे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी अनेक चारचाकी वाहनांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र आता या आदेशात आता सर्व स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
विमान प्रवाशांनाही निवासस्थानापर्यंत वाहनाची परवानगी
जळगाव विमानतळावर येणाºया प्रवाशांनाही विमानतळापासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत वाहनाने येण्याची मुभा राहणार आहे. त्यासाठी विमान प्रवासाचा पुरावा सोबत बाळगणे अनिवार्य राहणार असल्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.