पारोळा येथे उपकोषागार अधिकाऱ्यास एक हजारांची लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 08:59 PM2018-10-22T20:59:02+5:302018-10-22T20:59:48+5:30
मंजूर निधी खात्यात वळविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारा येथील उपकोषागार अधिकारी शिवदास हंसराज नाईक (वय ५०, वर्ग तीन) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पारोळा येथील उपकोषागार अधिकारी कार्यालयात २२ रोजी ही कारवाई केली.
पारोळा, जि.जळगाव : मंजूर निधी खात्यात वळविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारा येथील उपकोषागार अधिकारी शिवदास हंसराज नाईक (वय ५०, वर्ग तीन) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पारोळा येथील उपकोषागार अधिकारी कार्यालयात २२ रोजी ही कारवाई केली.
सूत्रांनुसार, पारोळा येथील तक्रारदार वनक्षेत्रपालाचे भविष्य निर्वाह निधीचे ८० हजार रुपये मंजूर झाले होते. ही रक्कम त्यांना धनादेशाने अदा करण्यात येणार होती, पण त्यांना पैशांची अत्यंत आवश्यकता होती. त्यामुळे ते उपकोषागार अधिकारी शिवदास हंसराज नाईक यांना १९ रोजी भेटले व आपण माझी ८० हजार रक्कम धनादेशाने न देता, आॅनलाइन माझ्या खात्यात जमा करावी, अशी मागणी केली. यावर उपकोषागार अधिकारी नाईक यांनी त्यांच्याकडे १२०० रुपये लाचेची मागणी केली, यानंतर तक्रारदाराने धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ रोजी उपकोषागार कार्यालयात सापळा रचला. त्यात शिवदास नाईक यास तक्रारदाराकडून एक हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पवन देसले, नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सारंग, कृष्णकांत वाडीले, सतीश जावरे, प्रशांत चौधरी, सुधीर सोनावणे आदींनी केली.