लवाद नियुक्तीचा ठराव मंजूर झाल्यानंतर वॉटर ग्रेस घेणार याचिका मागे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:27+5:302021-05-14T04:16:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराची दैनंदिन साफसफाई करणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनी व महापालिका प्रशासनामधील वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराची दैनंदिन साफसफाई करणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनी व महापालिका प्रशासनामधील वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी त्रयस्थ व्यक्तीची लवाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वॉटर ग्रेसच्या मागणीनंतर ही नियुक्ती करण्यात आली असली तरी मनपा प्रशासनाने देखील याबाबत वॉटर ग्रेस कंपनीने मनपा प्रशासनाविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्याची अट घातल्याने आता वॉटर ग्रेस कंपनी याचिका मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वॉटरग्रेस सोबत सुरुवातीपासूनच वाद सुरू झाला होता. मात्र, जुलै २०२० मध्ये नव्याने ठेका दिल्यानंतर काही प्रमाणात मनपातील व वॉटर ग्रेसमधील वाद कमी झाला असला, तरी या ठेक्यात सुनील झंवर यांचे नाव आल्यानंतर पुन्हा वाद सुरू झाला होता. दरम्यान, मनपा प्रशासनाने ठेकेदाराला ठोठावलेल्या दंडाबाबत ठेकेदाराने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमुळे मनपा प्रशासन देखील काही प्रमाणात अडचणीत येण्याची शक्यता होती. त्यामुळे ठेकेदाराच्या मागणीनुसार मनपाने लवाद नियुक्तीच्या ठराव केला, तर त्या बदल्यात न्यायालयातील याचिका मागे घेण्याबाबतचा तह मनपाला करावा लागला आहे. दरम्यान, ठेकेदार, मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी वादाचे राजकारण न करता भविष्यात शहरातील साफसफाईच्या प्रश्नावर आक्रमक होण्याची गरज आहे.