जळगावात पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 01:01 AM2019-07-07T01:01:37+5:302019-07-07T01:02:12+5:30
अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर अबकारी कर व सेस वाढविण्यात आल्याचा परिणाम
जळगाव : अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर अबकारी कर व सेस वाढविण्यात आल्याने जळगावात पेट्रोल २.५२ रुपयांनी तर डिझेल २.५६ रुपयांनी महागले आहे. शनिवारी सकाळपासूनच हे दर लागू झाले आहेत. इंधनाच्या या भाववाढीने महागाई आणखी भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर वाढणार असल्याचे संकेत असल्याने त्यापूर्वीच केंद्र सरकारने अर्थसंकल्पात इंधनावर प्रती लीटर एक रुपया अबकारी कर व एक टक्के सेस वाढविला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव स्थिर असताना भारतात या कराच्या बोझाने इंधनात भाव वाढ झाली आहे
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी ५ जुलै रोजी पेट्रोल जळगावात ७७.०९ रुपये तर डिझेल ६७.२६ रुपये होते. मात्र कर वाढीनंतर ६ रोजी सकाळपासून पेट्रोल ७९.६१ रुपये व डिझेल ६९.८२ रुपये झाले.
आणखी वाढ होण्याची शक्यता
सध्या करामुळे अडीच रुपयांच्यावर प्रती लिटरने इंधनाचे दर वाढले असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर दर वाढल्यानंतर या वाढत्या करानुसार भाव अधिक वाढतील व सोबतच महाराष्ट्रात पेट्रोलवर असलेला २६ टक्के व डिझेलवरील २४ टक्के मूल्यवर्धीत कराचा बोझा (व्हॅट) वाढत्या किंमतीच्या तुलनेत वाढत जातो.
अर्थसंकल्पात वाढविण्यात आलेल्या अबकारी कर व सेसमुळे वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती ६ जुलैपासून लागू झाल्या आहेत. यात अडीच रुपयांच्यावर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत.
- प्रकाश चौबे, अध्यक्ष, जळगाव जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशन.