पेट्रोल दराचा भडका, भाव उच्चांकी पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 06:57 PM2017-08-19T18:57:19+5:302017-08-19T21:19:30+5:30

दीड महिन्यात लिटरमागे चार रुपये वाढः महाराष्ट्रात सर्वाधिक दर, उत्तर महाराष्ट्रात जळगावात महाग

Petrol prices in Maharashtra are at a high level | पेट्रोल दराचा भडका, भाव उच्चांकी पातळीवर

पेट्रोल दराचा भडका, भाव उच्चांकी पातळीवर

Next
ठळक मुद्देदेशातील प्रमुख राजधानीच्या शहरांमध्ये मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक तर पणजीत सर्वात कमी असतात.महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवर २५ ते २६ टक्के व्हॅट आणि ९ टक्के दुष्काळी अधिभारासह एकुण ११ टक्के अधिभार वसूल केला जातो. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईलच्या पेट्रोल दरात लिटरमागे सरासरी १० रुपयांचा फरक महाराष्ट्राचा विचार केला तर सद्यस्थितीला राज्यात सर्वात महाग पेट्रोल पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आहे. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात पेट्रोलचे भाव सर्वाधिक आहेत.

ललित झांबरे/ आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१९ - गेल्या दीड महिन्यात पेट्रोलच्या भावात लिटरमागे साधारण तीन ते चार रुपये आणि गेल्या वर्षभरात तब्बल १२ ते १४ रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत १९ अॉगस्ट रोजी हिंदुस्थान पेट्रोलियमचे पेट्रोलचे दर ७७ रुपये५४ पैसे होते. वर्षभरापूर्वी १६ अॉगस्टला हेच दर ६५ रुपये ०३ पैसे होते. म्हणजे वर्षभरात लिटरमागे झालेली वाढ १२ रुपये ५१ पैसे येते. दीड महिन्यापूर्वी मुंबईत ७४ रुपये ३५ पैसे असलेले पेट्रोलचे दर तीन रुपये १९ पैशांनी वाढले आहेत.  
जळगावात १ जुलै रोजी पेट्रोलचे भाव ७४ रुपये २१ पैसे लिटर होते. तेच भाव आता १९ अॉगस्ट रोजी ७८ रुपये ४९ पैशांवर पोहचले आहेत. म्हणजे दीड महिन्यात पेट्रोलच्या दरात लीटरमागे झालेली वाढ ४ रुपये २८ पैसे आहे. 
केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीचा आढावा १५ दिवसाआड घेण्याऐवजी दररोज घेण्याचा निर्णय यंदा १६ जूनपासून घेतला.  त्यामुळे हळूहळू होणारी ही दरवाढ पटकन कुणाच्या लक्षातही येत नाही कारण दिवसाला १०-१२ पैसे झालेली वाढ फार वाटत नाही पण कालांतराने तिचा एकत्रित परिणाम मोठा झालेला दिसतो. 
१९ अॉगस्ट रोजी असलेले पेट्रोलचे दर हे आतापर्यंतचे सर्वाधिक दर असावेत. याआधी मुंबईतील सर्वाधिक दर २३ एप्रिल रोजी ७७ रुपये ४५ पैसे होता.तो आता ७७ रुपये ५४ पैसे आहे. 
१६ जूनपूर्वी दर १५ दिवसांआड दर जाहीर व्हायचे तेंव्हा दोनेक रुपये जरी वाढ झाली तरी फार ओरड व्हायची पण आता दैनंदिन आढावा सुरु झाल्यापासून ही दरवाढ जाणवेल अशी लक्षातच येत नसल्याने ती ओरड बंद झाली आहे.  देशभरात १६ जूनला पेट्रोलियम पदार्थांची दैनंदिन आढावा पध्दती लागू झाली त्यावेळी पेट्रोलचे दर एक रुपया १२ पैशांनी कमी झाले होते. 
१६ जूनपासून दैनंदिन दरआढावा पध्दती लागू झाल्यापासूनचा मुंबईतील दरांचा आढावा घेतला तर ५ जुलैपर्यंत सातत्याने भाव उतरत राहिले. या काळात पेट्रोलचे दर ७६ रुपये ७५ पैशांवरुन ७४ रुपये ३४ पैशांपर्यंत आले. मात्र त्यानंतर सातत्याने वाढ दाखवत १० जुलैला ते ७५.०८ पैशांवर पोहचले. त्यानंतर ११ जुलै रोजी या काळातील भावात सर्वात मोठी घसरण पहायला मिळाली. प्रतिलिटर १ रुपया ७७ पैसे भाव कमी होऊन ११ जुलै रोजी भाव  ७३.३१ रुपये झाला. त्यानंतरही भाव कमी होत १४ जुलै रोजी ७३ रुपये २८ पैशांपर्यंत पोहचले. हा दैनंदिन दरबदलाच्या काळातील सर्वात कमी भाव ठरला.
 १५ जुलैनंतर मात्र (३१ जुलैचा अपवाद वगळता) पेट्रोलचे भाव सातत्याने वधारतच राहिले. ४ ते ७ अॉगस्टदरम्यान दरात साधारण एक रुपयाने तर ११ ते १३ अॉगस्टदरम्यान लिटरमागे ८० पैशांनी वाढ झाली. गेल्या आठ दिवसातच मुंबईत पेट्रोलचे दर ८६ पैशांनी वाढले आहेत. मात्र ही वाढ लक्षात येत नाही. 
देशभरात ही स्थिती आहे. देशातल्या काही प्रमुख राजधानीच्या शहरांतील पेट्रोलचे प्रतीलिटर भाव (रुपयांमध्ये) पाहिले तर हे लक्षात येईल. (स्रोतः सिफी.कॉम) 

शहर              १९ अॉगस्ट     १ अॉगस्ट    १७ जुलै        २२ जून    
नवी दिल्ली    ६८.३७          ६५.४०        ६४.६५        ६४.४४    
कोलकाता       ७१.१४          ६८.५६         ६७.५८       ६७.२१    
मुंबई              ७७.५४        ७४.५६         ७३.४९      ७५.६८    
चेन्नई            ७०.८३          ६७.७१         ६६.६१        ६६.९३    
बंगळुरू            ६९.४२          ६६.३९        ६५.३२        ६८.८२    
भोपाळ            ७५.०५         ७१.९९        ७०.७०       ७१.६९    
गांधीनगर       ७०.१३           ६७.०९        ६५.८६       ६६.२०    
हैदराबाद         ७२.३९          ६९.२४         ६८.१५        ६८.४६    
लखनऊ         ७०.९६           ६८.६३        ६७.६५       ६७.६३    
पणजी           ६१.९४             ५९.२५       ५८.२३        ५८.५२    


या तक्त्यावरून हे लक्षात येईल की देशातील प्रमुख राजधानीच्या शहरांमध्ये मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आणि पणजीत सर्वात कमी असतात. एकंदरीत देशात गोव्यात पेट्रोल सर्वात स्वस्त तर महाराष्ट्रात सर्वात महाग आहे. 
मुंबई व महाराष्ट्रात पेट्रोलचे दर सर्वाधिक असण्याचे कारण आहे अधिभार आणि व्हॅट महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवर २५ ते २६ टक्के व्हॅट आणि ९ टक्के दुष्काळी अधिभारासह एकुण ११ टक्के अधिभार वसूल केला जातो. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईलच्या पेट्रोल दरात लिटरमागे सरासरी १० रुपयांचा फरक दिसून येतो. या अधिभारामुळेच महाराष्ट्रातील जनतेला १ एप्रिल रोजी केंद्र सरकारने पेट्रोलचे दर ३ रुपये ७७ पैशांनी कमी केल्यावरसुध्दा त्याचा लाभ मिळाला नव्हता. राज्य सरकारने त्यानंतर लगेच दुष्काळ अधिभार तीन टक्क्यांनी वाढवून नऊ टक्के केला होता. त्यामुळे त्यावेळी राज्याच्या राजधानीच्या शहरांमध्ये भोपाळला मागे टाकत मुंबई पेट्रोलच्या दराबाबत सर्वात महागडे शहर ठरले होते. राजधानीच्या शहरांमध्ये मुंबईचा तो लौकिक अजुनही कायम आहे. भोपाळपेक्षा मुबईतील पेट्रोलचे दर आजच्या घडीला साधारण अडीच रुपये जास्त आहेत. 
महाराष्ट्राचा विचार केला तर आजच्या घडीला राज्यात सर्वात महाग पेट्रोल पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आहे. 
१९ अॉगस्ट रोजी या भागात शेल कंपनीच्या पेट्रोलचा दर ७९ रुपये २५ पैसे प्रतिलिटर होता. पुणे महापालिका क्षेत्रात ७९ रुपये २० पैसे तर परभणीला हिंदुस्थान पेट्रोलियमचा दर  ७९ रुपये २२ पैसे प्रतीलिटर असा शुक्रवारचा दर राहिला. 
राज्यातील प्रमुख शहरांतील पेट्रोलचे दर पुढीलप्रमाणे..(स्रोत- चेक पेट्रोल प्राईस.कॉम) 

शहर                 १९ अॉगस्ट    १० अॉगस्ट     ५ अॉगस्ट    ३० जून    
अहमदनगर    ७७.५४           ७६.१३           ७५.४०          ७३.४०    
अमरावती       ७८.७१            ७७.३२        ७६.६४        ७४.६७    
औरंगाबाद       ७८.५९           ७७.१७        ७६.३९         ७४.४६    
धुळे                 ७७.५२          ७६.१३         ७५.४६        ७३.४७    
कोल्हापूर         ७७.८०          ७६.४२        ७५.७५       ७३.७७    
लातूर               ७८.३१           ७६.९२         ७६.२६           ७४.३०    
मुंबई               ७७.५४          ७६.१५          ७५.४७        ७४.६०    
जळगाव          ७८.४९           ७७.१०        ७६.४४         ७४.४९    
नागपूर             ७७.८२         ७६.४४        ७५.७७        ७३.७६    
नंदूरबार           ७८.६१           ७७.२१         ७६.५४         ७४.५७    
नाशिक            ७७.९४          ७६.५५       ७५.८८          ७३.९१    
पुणे                  ७७.४२          ७६.०४         ७५.३७         ७३.३७    
सोलापूर            ७८.०९          ७६.६९        ७६.०२            ७४.०२    


नाशिक विभागाचा विचार करता जळगाव जिल्ह्यात पेट्रोलचे भाव सर्वाधिक आहेत. शनिवार  १९ अॉगस्ट रोजी जळगावात हिंदुस्थान पेट्रोलियमचा दर ७८ रुपये ४९ पैसे प्रतीलिटर होता. तर अहमदनगर जिल्ह्यात हाच दर ७७ रुपये ५४ पैसे होतो.

नाशिक विभागातील प्रमुख शहरांतले १९ अॉगस्ट रोजीचे दर पुढीलप्रमाणे (हिंदुस्थान पेट्रोलियम- स्रोतः चेकपेट्रोलप्राईस.कॉम)
जळगाव-        ७८.४९
धुळे-               ७७.५२
नंदुरबार-        ७८.६१
नाशिक-         ७७.९४
अहमदनगर- ७७.५४

(या वृत्तांतात स्वतंत्र उल्लेख केलेला असल्याशिवाय पेट्रोलचे दर हे मुंबईतील असून प्रतिलिटरचे आहेत. स्वतंत्र उल्लेख असल्याशिवाय दर हिंदुस्थान पेट्रोलियमचे आहेत.)
स्रोत - इंडियनपेट्रोलप्राईस.कॉम
        चेकपेट्रोलप्राईस.कॉम

Web Title: Petrol prices in Maharashtra are at a high level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.