जामनेर तालुक्यातील लोंढ्री गावाजवळ पेट्रोलचा टँकर उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 05:55 PM2019-09-01T17:55:16+5:302019-09-01T17:56:35+5:30
लोंढ्री, ता.जामनेर येथील पहूर बुलढाणा अंतर्गत रस्त्यावर पेट्रोलचा टँकर उलटल्याची घटना रविवारी दुपारी बाराला घडली.
पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : लोंढ्री, ता.जामनेर येथील पहूर बुलढाणा अंतर्गत रस्त्यावर पेट्रोलचा टँकर उलटल्याची घटना रविवारी दुपारी बाराला घडली. सुदैवाने जीवित हानी टळली. पण तीन तास पेट्रोल गळतीने वित्त हानी झाली. वाहणारे पेट्रोल भरण्यासाठी गावाजवळील नागरिकांनी एकच झुंबड केल्याने घटनास्थळी दाखल पहूर पोलिसांनी त्यांना लाठ्यांचा प्रसाद दिला.
पहूर ते बुलढाणा हा अंतर्गत रस्ता आहे. यादरम्यान लोंढ्री गावाजवळील काशिनाथ भागवत यांच्या शेताजवळ वळण रस्त्यावर एमएच-२०-एए-९९८८ क्रमांकाचा पेट्रोलने भरलेला ट्रक उलटला. हा टँकर फत्तेपूर येथील एका पेट्रोलपंपावर खाली करण्यात येणार होता. यात सहा हजार लीटर पेट्रोल व सहा हजार लीटर डिझेल भरलेले होते. झालेल्या गळतीने सैयद नूर अली अश्रफ या शेतकºयाच्या शेतातील कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे. गळती लागल्याने गावाजवळील काही नागरिकांनी मदत करण्याऐवजी पेट्रोल वाहण्यास एकच गर्दी केली. त्यामुळे घटनास्थळी सुरक्षेचा प्रश्न समोर आल्याने १० मिनिटात पहूरवरून घटनास्थळी दाखल झालेले सपोनि राजेश काळे, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, भरत लिंगायत, प्रवीण देशमुख, जितेंद्र परदेशी, अनिल सुरवाडे यांनी नागरिकांना पेट्रोल घेऊन जाण्यास मज्जाव केला. वेळेप्रसंगी त्यांना लाठ्यांचा चोप दिल्याने जमलेला जमावाला सुरक्षित अंतरावर पांगविले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यादरम्यान काळे यांनी अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले. याचबरोबर आरसीएफ तुकडी बंदोबस्तासाठी लावण्यात आली. अखेर दुपारी तीन वाजता उलटलेल्या टँकरला क्रेनच्या साहाय्याने सुरळीत करण्याची तयारी सुरू झाली. सायंकाळी पाचपर्यंत हा टँकर रस्त्यावर पूर्ववत करण्यात यश आले.