सातपुड्यातील आदिवासींचा ‘फगवा उत्सव’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 07:47 PM2018-03-04T19:47:55+5:302018-03-04T19:47:55+5:30
सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी आपल्या पारंपरिक धार्मिक उत्सव तथा चालीरीतीचे जतन करतात आणि त्यातून जीवनाचा आनंद शोधतात अशा या जगावेगळ्या लोकांचे सण, उत्सवही वेगळेच असतात.
- जयदेव वानखडे
जळगाव जामोद : सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी आपल्या पारंपरिक धार्मिक उत्सव तथा चालीरीतीचे जतन करतात आणि त्यातून जीवनाचा आनंद शोधतात अशा या जगावेगळ्या लोकांचे सण, उत्सवही वेगळेच असतात. हिंदू संस्कृतीला धरून असणा-या सर्व धार्मिक परंपरेत त्यांच्या मते फगवा उत्सव हा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. यासाठी तब्बल पाच दिवस ते आपली कामे सोडून फगव्यात मग्न असतात.
यावर्षीही आदिवासी ग्राम उमापूर, काळमाटी, भिंगारा, चारबन, हनवतखेड, रायपूर, गारपेठ, निमखेडी, आदी गावांमध्ये हा फगवा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आपल्या पारंपरिक वाद्यांसह पारंपरिक नृत्याने हे आदिवासी शहरवासीयांची मने वेधताना दिसतात. जळगाव शहराच्या उत्तरेस सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये आदिवासींची गावे आहेत. या उत्सवाला हे आदिवासी शहरात येऊन भंग-या मागतात आणि फगवा गोळा करून नेतात.
यंदा उमापूर आणि कालमाटी येथील फगवा उत्सवातील आदिवासी शहरात वेगवेगळ्या वेशभूषा करून आणि महिला नृत्य करून अन्नधान्य व देणगी गोळा करीत आहे. होळी पेटल्यानंतर दुस-या दिवसापासून चार दिवस गावागावात फिरून आणि मोठमोठे ढोल वडवून घुंगरांच्या तालावर थिरकत थिरकत आपल्या आदिवासी नृत्यकला आविष्काराचे प्रदर्शन करतात. त्यानंतर त्यांच्या गावामध्ये ही अन्नधान्य गोळा करतात. हे करत असताना कुणावरही त्यांची जबरदस्ती नसते. प्रेमाने जे दिले ते घ्यायचे याप्रमाणे जेवढे अन्नधान्य व पैसा अडका जमा होता त्यामध्ये पाचव्या दिवशी गावामध्ये मोठा भंडारा केला जातो. यावर्षी हा कार्यक्रम ६ मार्च रोजी होणार असल्याचे सांगितले.
काबाडकष्ट करून जीवन जगणा-या आदिवासीच्या जीवनात हा उत्सव मोठा आनंद निर्माण करतो. बायका मुले, म्हातारी माणसे मोठ्या उत्साहाने यात सहभाग होतात.
आदिवासी लोकांना परंपरा जिवंत राहावी, यातून लोकांचे निखळ मनोरंजन व्हावे आणि आदिवासी बांधवांमधील एकोपा कायम राहावा, यासाठी आम्ही काही ठरावीक मंडळी स्वत: पुढाकार घेऊन फगवा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो.
- केशवसिंग राऊत - शिक्षक उमापूर
आमदार हर्षवर्धन सपकाळांचाही सहभाग
संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्यातील पर्वत राजीत पारंपरिक रहिवाशी असलेल्या आदिवासी बांधवांच्या फगवा या होळीनंतर ८ दिवस साजरा होणा-या उत्सवाचे चालठाना येथे आयोजन करण्यात आले होते. या पारंपरिक उत्सवात आमदार हर्षवर्धन सपकाळ हे आज सहभागी झाले.