बहिणाबाई महोत्सवातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:21 PM2018-03-16T13:21:24+5:302018-03-16T13:21:24+5:30
स्थानिक कलावंतांसोबतच महाराष्ट्रातील विविध लोककलावंतांनी जळगाव येथे झालेल्या बहिणाबाई महोत्सवाला हजेरी लावली. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारुडकार निरंजन भाकरे, युवा शाहीर रामानंद उगले यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने आपल्या श्रेष्ठ सांस्कृतिक परंपरेचे दर्शन उपस्थितांना घडविले.
अमेरिकेपर्यंत महाराष्ट्राची लोकपरंपरा पोहचवणारे जागतिक कीर्तीचे भारुडकार, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रामानंद उगले यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. उत्कृष्ट व रंगतदार विडंबनात्मक शैलीतील सादरीकरणाने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू खेळवले. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील वासुदेव, महाराष्ट्राचा गौरव वर्णन करणारा पोवाडा, गण, बतावणी सादर झाल्यानंतर व्हॉट्सअॅप व फेसबूकच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या अतिआहारी गेलेल्या युवा पिढीवर भाष्य करणाºया विडंबनात्मक भारुडाने प्रेक्षकांची दाद मिळविली.
राज्यात कोठेही गेल्यास ‘बुरगुंडा होईल बया गं’ या भारुडामुळे प्रसिद्ध असलेले निरंजन भाकरे यांनी बहिणाबाई महोत्सवामध्ये भारुड या लोककलेचे सादरीकरण केले. भारुडातून जनप्रबोधन करण्यासोबतच सरकारच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाकरे हे नेहमीच प्रयत्नशील असतात. सोंगी भारुड व एकनाथी भारुडाची परंपरा पुढे चालविणाºया मोजक्या कलावंतांपैकी निरंजन भाकरे हे एक कलावंत आहेत. गणेश वंदना, वासुदेव, नंदीबैल, कुडबुड्या जोशी, भविष्यकार या सोंगी भारुडाला तर प्रख्यात एकनाथी भारुडाला प्रेक्षकांनी दाद दिली. एकंदरीत, खान्देशी मातीचा अभिमान सांगणारा, संस्कृतीचे गोडवे गाणारा आणि महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणारा हा लोकोत्सव पाच दिवस रंगला होता.
संस्कृतीचा महोत्सव
नृत्य, नाट्य, संगीत यासोबतच चित्रकला, पोस्टर्स या कलांनाही प्रोत्साहन मिळावे याकरिता बहिणाबाई महोत्सवात पोस्टर्स स्पर्धाही रंगली. विविध वयोगटातील चित्रकारांच्या कुंचल्यातून उमटलेले रंगाचे आविष्कार खान्देशी संस्कृतीचे इंद्रधनुष्य उमटविणारेच ठरले.
- विनोद ढगे